“राजश्री मधून बोलतोय” असा फोन करून लक्ष्मीकांत बेर्डे करायचे सर्वांची टिंगल… जेव्हा त्यांनाच राजश्रीमधून फोन आला तेव्हा..
लक्ष्मीकांत बेर्डे हे मराठी सृष्टीतील खळखळता हास्याचा झराच मानले जायचे अगदी लहानपणापासूनच अतिशय खोडकर असलेले लक्ष्मीकांत बेर्डे आपल्या स्वभावगुणामुळे कित्येकांची चेष्टा मस्करी करण्यात पटाईत होते. विनोदाचा हा वारसा त्यांनी त्यांच्या आई रजनी यांच्या कडूनच घेतला होता. आर्थिक परिस्थिती बिकट असली तरी छोट्या छोट्या गोष्टीतून विनोद करून आनंद कसा मिळवायचा, विनोदाचा हा अंग त्यांनी त्यांच्या आईकडूनच शिकून घेतला होता. लहानपणी आपण बस कंडकटर व्हायचं आणि तिकिटाचे पैसे मिळवून भरपूर श्रीमंत व्हायचं असा विचार त्यांनी केला मात्र त्यामागचे खरे सत्य काय होते ते कालांतराने त्यांना समजले होते.
मराठी नाटक, दूरदर्शन मालिका अशा प्रवासातून त्यांनी मराठी सृष्टीत भरघोस यश मिळवलं. लक्ष्मीकांत बेर्डे हे नाव विनोदाचे बादशाह बनून प्रत्येकाच्या ओठी येऊ लागलं. लक्ष्मीकांत बेर्डे आपल्या सहकलाकारांना नेहमी त्रास देत असत मी राजश्री मधून बोलतोय असे म्हणून ते आपल्या कलाकारांची चेष्टा मस्करी करत असत. एकदा अचानक त्यांच्या घरी असाच फोन वाजला आणि उद्या राजश्रीच्या ऑफिसवर या असे म्हणून फोन ठेऊन दिला त्यावरून आपली देखील कोणीतरी चेष्टा करतंय असे म्हणून त्या गोष्टीकडे त्यांनी दुर्लक्ष केले. एक दोन दिवस गेल्यावर पुन्हा राजश्रीच्या ऑफिसमधून त्यांना फोन आला यावेळी मात्र विश्वास ठेवण्यापलीकडे काही करणे त्यांना कठीण होते. दुसऱ्याच दिवशी राजश्रीच्या ऑफिसमध्ये गेल्यावर मैने प्यार किया चित्रपटात काम करण्याची नामी संधी त्यांना मिळाली. पदार्पणातील या हिंदी चित्रपटाने लक्ष्मीकांत बेर्डे यांना अमाप प्रसिद्धी मिळवुन दिली होती. हम आपके है कौन, अनाडी, साजन अशा अनेक हिंदी चित्रपटातून त्यांनी विनोदाचे अचूक टायमिंग हेरून प्रेक्षकांना खळखळू हसवले तर कधी निरागस अभिनयातून प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणले. त्यांच्या हिंदी चित्रपटातल्या काही भूमिका अधोरेखित करणाऱ्या ठरल्या होत्या.
मराठी सृष्टीतला हा लखलखता तारा मात्र अचानकपणे कधी निखळला ते कळलेच नाही. विनोदाच्या या बादशहाला आमच्या समूहाकडून विनम्र अभिवादन..
kalakar.info ची टीम सतत नवीन रंजक गोष्टी तुमच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करते, तुम्हाला त्या आवडत असतील अशी आशा आहे. तुमच्याही कुंचल्यात काही गमती जमती किंवा कलाकारांचे किस्से असतील तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये किंवा फेसबुक वर जरूर कळवा; आम्ही ते पब्लिश करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. लोभ असावा, धन्यवाद.