स्वराज्यरक्षक संभाजी आणि आई कुठे काय करते मालिका अभिनेत्री गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर तिच्या सामाजिक बांधिलकीमुळे चांगलीच चर्चेत येत आहे. ही अभिनेत्री आहे “अश्विनी महांगडे”.
गेल्या दोन वर्षांपासून अश्विनी महांगडे या “रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान” अंतर्गत विविध समाज उपयोगी योजना राबवताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांनी या प्रतिष्ठान अंतर्गत महाराष्ट्रभर उपचारासाठी दाखल झालेले रुग्ण आणि यांच्यासोबत आलेल्या नातेवाईकांसाठी मोफत जेवणाची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यांच्या या कार्याचे महाराष्ट्रभर कौतुक होताना दिसत आहे.
फलटण, सातारा, शिरवळ, खंडाळा, सासवड, बारामती, टिटवाळा शहर, ठाणे शहर, कल्याण शहर, अष्टा शहर, हिंडलगा बेळगाव, इस्लामपूर, नेरुळ, अंधेरी, घाटकोपर अशा महाराष्ट्रातील विविध ठिकाणी त्यांनी ही मोफत जेवणाची योजना आखल्याचे सांगितले आहे रुग्णांची आणि पर्यायाने त्यांच्या सोबत आलेल्या नातेवाईकांची जेवणाशिवाय हेळसांड होऊ नये हाच यामागचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. “या महासंकटात बाहेर सर्वच गोष्टीची टंचाई निर्माण झाली आहे. या कठीण काळात आपल्या लोकांना आपली गरज आहे. आपण प्रत्येकजण या समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून जमेल तशी मदत करा. नक्कीच पुण्य मिळेल. आम्हीही शक्य ती व शक्य त्या ठीकाणी आमचं कर्तव्य पार पाडीत आहोत. तुम्हीही यामधे सामील व्हा. ” असे म्हणून त्यांनी इतरांनाही मदतीचे आवाहन करण्यास सांगितले आहे.
एवढेच नाही तर रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान अंतर्गत त्यांनी रक्तदान शिबिर आयोजित केले आहेत. गड किल्ल्यांचे महत्व कळावे त्याच्याबद्ल आपुलकी निर्माण व्हावी या हेतूने त्यांनी स्पर्धा देखील आयोजित केलेल्या दिसल्या वाचनाची आवड निर्माण व्हावी या हेतूने पुरंदर येथे रयत बुक बँक देखील त्यांनी स्थापन केली आहे. मधल्या काळात महावारी या वेबसिरीज मधून महिलांच्या समस्येबाबत जागरूकता घडवून आणली अशी एक ना अनेक सत्कार्ये त्यांच्या हातून घडत आहेत. याचमुळे अश्विनी महांगडे या सामाजिक बांधिलकी जपणारी अभिनेत्री म्हणून नाव लौकिक करताना दिसत आहेत. स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत त्यांनी साकारलेली छत्रपतींची कन्या राणूआक्का त्यांच्या कार्यातून पदोपदी सिद्ध होताना दिसते…