हिंदी चित्रपट अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची तब्येत खालावल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात आली आहे. आज सकाळीच मिथुन चक्रवर्ती यांच्या छातीत कळ आली असल्याने त्यांना कलकत्त्यातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मिथुन चक्रवर्ती हे ७३ वर्षांचे आहेत. खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू असून त्यांच्या तब्येतीबाबत अधिक माहिती देण्याचे कुटुंबीयांनी टाळले आहे. मिथुन चक्रवर्ती यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या काही वर्षापासून शारीरिक त्रास जाणवू लागला आहे.
हॉस्पिटलमध्ये दाखल झालेला त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, पण हा फोटो २०२२ चा असल्याचे सांगितले जाते. त्यावेळी मिथुन चक्रवर्ती यांना उलट्याचा त्रास जाणवू लागला होता, तसेच पोटात दुखत असल्याने त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी किडनी स्टोनमुळे त्यांच्यावर उपचार चालू होते अशी माहिती मुलाने दिली होती. दरम्यान आज सकाळीच छातीत दुखू लागल्याने मिथुन चक्रवर्ती यांना पुन्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत अपडेट अजूनही मिळाली नसली तरी चाहत्यांनी ते लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना केली आहे.
काहीच दिवसांपूर्वी मिथुन चक्रवर्ती याना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. तेव्हा आपल्याला हा सन्मान मिळतोय हे पाहून ते खूपच खुश झाले होते. याबद्दल त्यांनी चाहत्यांचे आभार देखील मानले होते. अभिनय क्षेत्रात येण्यासाठी मिथुन यांनी अनेक खस्ता खाल्ल्या होत्या. नक्षलवादी ते सुपरस्टार अशी त्यांनी इंडस्ट्रीत ओळख बनवली आहे. काम करण्याचा त्यांचा उत्साह तरुणांना लाजवेल असाच आहे. त्यामुळे हा सन्मान घोषित झाल्यानंतर त्यांना खूप समाधान वाटले होते. म्हणूनच चाहत्यांनीही त्यांच्या प्रकृतीबाबत काळजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.