काही महिन्यांपूर्वीच रंग माझा वेगळा या स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. या मालिकेत हर्षदा खानविलकर कार्तिकच्या आईच्या भूमिकेत झळकल्या होत्या. हर्षदा खानविलकरने जॉर्ज स्कूल आणि कीर्ती एम डूंगर्सी कॉलेजमध्ये शिक्षण घेतले आहे. अभिनयासाठी तिने वकिलीचा अभ्यासक्रम सोडला होता. १९९० च्या दशकात दूरदर्शनवर चालणाऱ्या दर्द या हिंदी मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले होते. त्यानंतर आभाळमाया मालिकेमुळे तिला चांगली लोकप्रियता मिळाली होती.
कॉस्ट्यूम डिझायनर म्हणूनही तिने या इंडस्ट्रीत काम केले आहे. गुरुकुल, ऊन पाऊस, कळत नकळत, अस्तित्व एक प्रेम कहानी, दामिनी, माझिया प्रियाला प्रीत कळेना, पुढचं पाऊल अशा मालिकांमध्ये तिने विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात जागा बनवली. रंग माझा वेगळा मालिकेनंतर हर्षदा पुन्हा एकदा डॅशिंग भूमिकेत पाहायला मिळत आहे. नुकतेच सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेने २५ वर्षांचा लीप घेतला आहे. जयदीप आणि गौरीचा पुनर्जन्माची कहाणी यात दाखवण्यात येत आहे. त्यात आता हर्षदा खानविलकर सरपंचबाई वसुंधराची भूमिका साकारत आहे. अधिराजची आई वसुंधरा ही खूप खमकी आहे. मुलावर संकट आलं तर ती कोणालाही मारायला मागेपुढे पाहत नाही.
त्याचमुळे जयदीपचा पुनर्जन्म असलेला अधिराजसुद्धा तेवढाच धीट दाखवण्यात आला आहे. शहरात राहिलेला जयदीप आता अधिराज बनून गावच्या मातीत निर्धास्त बनला आहे. तर दुसरीकडे गावरान गौरी आता नित्याच्या रूपाने प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. नित्या उच्च शिक्षित आहे आणि कंपनीचा व्याप सांभाळणारी आहे. इथे नित्याच्या वडिलांच्या भूमिकेत अभिनेते गिरीश ओक झळकत आहेत. हर्षदा खानविलकर आणि गिरीश ओक या मालिकेतून पुन्हा एकदा दमदार भूमिका साकारताना दिसत आहेत. या नवीन एंट्रीमुळे मालिका अधिकच रंजक झाली आहे. मालिकेतील हे नवीन वळण उत्कंठावर्धक असले तरी प्रेक्षकांनी ही मालिका लवकरात लवकर संपवावी अशीही अपेक्षा व्यक्त केली होती.