गणपती बाप्पाला नेहमी २१ दुर्वा, २१ मोदकांचाच नैवेद्य दाखवला जातो. ह्या गोष्टी पूर्वापार चालत आल्यात म्हणून ही प्रथा आपणही तशीच पुढे चालवतो. पण यावर तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की, गणपती बाप्पाला २१च मोदक नैवेद्य म्हणून का देतात?. यामागे एक कथा सांगितली जाते ती अशी आहे की, पूर्वी देवांतक आणि नरांतक असे दोन राक्षस होते. हे राक्षस लोकांचा छळ करायचे त्यांना त्रास देत होते. रावणाचा वध करण्यासाठी जसे रामाने जन्म घेतला, कंसाला मारण्यासाठी जसे श्रीकृष्णाने जन्म घेतला.
तसेच देवांतक आणि नरांतक या दोन्ही राक्षसांना मारण्यासाठी देवबाप्पाने विनायकाचे रूप धारण केले. हे युद्ध सुरू करण्यासाठी विनायकाने सोबत २० सौनिक घेतले होते. पूर्वी हातांच्या बोटांवरून मोजमापे काढली जायची हाताची आणि पायाची दोन्ही मिळून २० बोटं होतात. या २० सैनिकांना गण असे संबोधले जायचे. या २० गणांचा प्रमुख म्हणून विनायकाने जबाबदारी घेतली होती. म्हणजेच बाप्पा एकटा २१ मोदक खात नाही तर या २१ जणांच्या टीमला मिळून २१ मोदक दिले जातात. त्यामुळे नेहमी बाप्पाला २१ मोदक किंवा लाडू नैवेद्य अर्पण केले जातात. ही कथा तुम्हाला झी मराठीच्या सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या मंचावर ऐकायला मिळणार आहे.
सारेगमप मध्ये चिमुरडी गायिका ऋचा ही नेहमी तिच्या सुरेल गाण्यांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. ऋचा एवढी लहान आहे पण तिचा या वयातला समजूतदारपणा पाहून अनेकांना तिचं कुतूहल वाटत असतं. ऋचाची आई शिक्षिका आहे. त्यामुळे ऋचावर चांगले संस्कार घडत गेले. या वयातच तिला बुंदीच्या लाडवांची रेसिपी अगदी तोंडपाठ आहे. ऋचा सुरेल तर गातेच शिवाय तिचे ज्ञानही प्रौढांना लाजवेल असे आहे. अशोक सराफ यांनो टॅलेंट पाहून खूप कौतुक केले होते. शोची एंकर मृण्मयी देशपांडे तिचं नेहमी कौतुक करत असते. या २१ मोदकांची गोष्टही ऋचाने न अडळलता मंचावर शेअर केली तेव्हा परिक्षकांनीही तिचं कौतुक केलेलं पाहायला मिळालं.