स्टार प्रवाह वाहिनीच्या तुलनेत झी मराठी वाहिनीवरील मालिकांना कमी टीआरपी मिळत आहे. गेल्या काही महिन्यांपासून स्टार प्रवाह वाहिनीवर नवनवीन मालिका दाखल झाल्या आहेत. त्यामुळे दुपारी देखील या वाहिनीवर नव्या मालिका पाहायला मिळत आहेत. मालिकेचा वाढता टीआरपी हे सगळे बदल घडवून आणत असल्याने कुठेतरी स्पर्धेत टिकून राहण्यासाठी झी मराठी वहिनी देखील प्रयत्न करत आहे. त्यामुळे झी मराठी वाहिनीवरील तब्बल दोन मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे निश्चित झाले आहे. आज शनिवार या दोन्ही मालिकांचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे.
संध्याकाळी ६ वाजता प्रसारित होणारी ‘घेतला वसा टाकू नको’ ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. या मालिकेच्या वेळेत येत्या ११ एप्रिल पासून ‘महा मिनिस्टर’ या शोचा एक तासाचा भाग पाहायला मिळणार आहे. गेल्या १८ वर्षांपासून वहिणींना पैठणीचा मान मिळवून देणारा आदेश बांदेकर यांचा होम मिनिस्टर हा कार्यक्रम बदलण्यात आला आहे. या महा मिनिस्टरच्या कार्यक्रमात आता वहिनींना सोन्याची जर असलेली आणि अस्सल हिऱ्यांनी सजलेली तब्बल ११ लाखांची पैठणी मिळवता येणार आहे. त्यामुळे या शोमध्ये सहभाग होण्यासाठी वहिनींची धावपळ सुरू झालेली आहे. या कार्यक्रमाचा पहिला भाग नाशिक येथे खेळला जाणार आहे.
नाशिक येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह, भाभानगर, मुंबई नाका, नाशिक येथे हा सोहळा रंगणार आहे. ११ लाखांची पैठणी मिळवण्यासाठी ही स्पर्धा चांगलीच चुरशीची ठरणार आहे. घेतला वसा टाकू नको या मालिकेचा आज शनिवारचा शेवटचा एपिसोड प्रसारित होत आहे. या मालिकेसोबतच आणखी एक मालिका आज प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. रात्रीस खेळ चाले ३ या मालिकेला प्रेक्षकांचा अल्पसा प्रतिसाद मिळत आहे. त्यात भर म्हणजे ही मालिका रात्री ११ वाजता प्रसारित करण्यात येत होती. या दोन्ही कारणामुळे मालिका निरोप घेत असल्याचे निश्चित करण्यात आले आहे. रात्रीस खेळ चाले या मालिकेचे दुसरे पर्व अपूर्वा नेमळेकरने साकारलेल्या शेवंताच्या भूमिकेने खूप गाजले होते.
तिसऱ्या पर्वात शेवंताची खूप कमी वेळेची भूमिका असल्याने. तसेच इतर कलाकारांकडून हीन दर्जाची वागणूक मिळाल्याने तिने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता. तिच्या ह्या निर्णयाने मालिकेच्या प्रेक्षकांनी नाराजी दर्शवली होती. त्यानंतर ही मालिका कलाकारांनी आपल्या अभिनयाने रंगवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र आता कुठेतरी थांबायला हवे हा महत्वपूर्ण निर्णय घेत मालिका संपवण्यावर भर देण्यात आला. रात्रीस खेळ चाले ३ या मालिकेच्या जागी कोणती नवी मालिका येणार हे अजून स्पष्ट झाले नाही. त्याबद्दलची अधिक माहिती येत्या काही दिवसातच जाहीर केली जाईल.