झी मराठी वाहिनीवर सध्या रिऍलिटी शोवर अधिक भर देत आहे. काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेला जाऊ बाई गावात हा रिऍलिटी शो प्रेक्षकांची पसंती मिळवताना दिसत आहे. बिग बॉस प्रमाणे याही शोमध्ये स्पर्धकांना वेगवेगळे टास्क देण्यात येत आहेत. याच जोडीला आता झी मराठी वहिनी छोट्या मुलांसाठी एक रिऍलिटी शो आणत आहे. ड्रामा जुनीअर्स या शोसाठी ऑडिशन घेणे चालू झाले आहे. तर येत्या काही दिवसात पारु आणि शिवा अशा आणखी दोन नव्या मालिका या वाहिनीवर दाखल होत आहेत. त्यामुळे झी मराठीवरच्या दोन मालिकांना आपला गाशा गुंडाळावा लागला आहे.
नवा गडी नवं राज्य या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र कालांतराने मालिकेचे कथानक वाढू लागल्याने प्रेक्षकांनी त्याकडे पाठ फिरवली परिणामी ही मालिका दुपारी दोन वाजता प्रसारित केली जाऊ लागली. पण गेल्याच आठवड्यात या मालिकेने आपला गाशा गुंडाळत प्रेक्षकांचा निरोप घेतला. तर झी मराठीची ३६ गुणी जोडी ही मालिका सुद्धा प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी ठरली होती. जानेवारी २०२३ मध्ये या मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला होता. पण काही महिन्यानंतर ही मालिका रात्री ११ वाजता दाखवण्यात येऊ लागली. जाऊ बाई गावात या रिऍलिटी शोमुळे मालिका दुपारी प्रसारित होईल असे सांगितले गेले. तर मधल्या काही दिवसांसाठी ही मालिका रात्री ९ वाजता प्रसारित होऊ लागली.
या एका वर्षाच्या कालावधीत मालिकेच्या प्रसारण वेळेत तब्बल चार वेळा बदल करण्यात आले. त्यामुळे प्रेक्षकांनी देखील या निर्णयावर आपली नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली होती. मालिका दुपारच्या वेळेत दाखवू नये अशी मागणी होत असतानाच मालिकेच्याच निरोपाची बातमी समोर आली. मालिकेचा निरोप घ्यायची वेळ आलीये असेच त्याच्या कथानकातून जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे मालिकेचे कलाकार देखील या निर्णयावर खूपच भावुक झालेले पाहायला मिळाले. दरम्यान मालिकेचा शेवटचा सिन शूट केल्यानंतर अविनाश नारकर, अनुष्का सरकटे, आयुष संजीव, ऋजुता देशमुख, प्रज्ञा एडके, संयोगीता भावे, संजना काळे, अक्षता आपटे या कलाकारांनी सेटवरच केक कापून एकमेकांना प्रेमाने तात्पुरता निरोप दिला.