महेश कोठारे दिग्दर्शीत आणि अभिनित ‘झपाटलेला’ हा चित्रपट आजही अनेक जण आवडीने पाहता. या चित्रपटाची कथा आणि यातली सर्वच पात्र अनोखी होती. चित्रपटाला आता जवळ जवळ २९ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र अद्यापही या चित्रपटाच्या एका भयानक सिन मागची गंमत कुणालाच माहित नाही. झपाटलेला चित्रपटामध्ये तात्या विंचू म्हणून असलेला बाहुला आजही पहिला की, अनेकांना घाम फुटतो. अशात शूटिंगवेळी एका सीन मधील गंमत अभिनेत्री पूजा पवार यांनी ‘हे तर काहीच नाही’ या कार्यक्रमात सांगितली आहे. लक्ष्मीकांत यांची प्रेयसी आवडे हिची भूमिका पूजा यांनी साकारली होती. या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ झी मराठीच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे.
व्हिडिओमध्ये पूजा असं म्हणल्या आहेत की, “महेश मला कधीच स्क्रिप्ट द्यायचे नाही. ते मला बोलायचे चल बघू जे होईल ते, फार कठीण नाहीये लक्षा सांभाळून घेईल. तात्या विंचू माझ्या अंगावर पडतो आहे असा सीन शूट करायचा होता. तर त्यावेळी मी कपाट उघडते आणि तात्या विंचू माझ्या अंगावर पडतो. त्याला पाहून मी बोलत असते की, काय रे लक्षा किती गोड आहे हा बाहुला आणि त्याला माझ्या जवळ घेते. त्यावेळी काहीच ठरवलेले डायलॉग नसताना देखील लक्षा पटकन बोलतो की, तात्या विंचू आतल्या आत लय खुश झाला असेल.” मंडळी झपाटलेला चित्रपट सर्वांच्याच आवडीचा आहे. मात्र त्यातले अनेक किस्से आजवर कुणालाच माहीत नाहीत. हेच किस्से हे तर काहीच नाही या कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिनेत्री पूजा पवार या सांगणार आहेत.
प्रत्येक कलाकार हा एक उत्तम नट असतो. मात्र या नटावर देखील अनेक विनोद होतात. असाच एक विनोदी किस्सा देखील पूजा यांनी या व्हिडिओमध्ये सांगितल्याचे दिसत आहे. पूजा सांगतात की, “आम्ही सर्व जण एका नाटकाच्या दौऱ्यावर होतो. दुपारचे जेवण करुन गाडीतून चाललो होतो. सर्वांनाच झोप आली होती. त्यावेळी अचानक एक माणूस म्हणाला की, आहो आहो पूजा तुमचा नट पडला. हे ऐकून सर्व जन जागे झाले. वाहनचालक देखील खाली उतरुन पाहू लागला की, कोणता नट पडला आहे. आणि मागच्या सीटवर पाहिलं तर खरच आमचा एक नट पडला होता.” हे ऐकताच कार्यक्रमात एकच हशा पसरल्याचे दिसत आहे.