कलर्स मराठी वाहिनीवरील योग योगेश्वर जयशंकर या अध्यात्मिक मालिकेला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. या मालिकेत बाल जयशंकरच्या भूमिकेत आरुष बेडेकर झळकला होता. आरुषला या भूमिकेने मोठी लोकप्रियता मिळाली होती. अभिनेता चिन्मय उदगीरकर याने मालिकेची निर्मिती केली आहे. जयशंकर महाराजांचा महिमा पहिल्यांदाच मालिके मधून प्रेक्षकांना अनुभवता आला आहे. उमा ऋषीकेश, अतुल आगलावे, भूमिका देसले, सोनाली पाटील, पल्लवी पटवर्धन, जागृती पगार अशा अनेक कलाकारांना मालिकेत अभिनयाची संधी मिळाली. आरुषचे वडील सुद्धा मालिकेत एका छोट्याशा भूमिकेत झळकले होते.
मालिकेने जसजसा लीप घेतला आहे, तसतसे मालिकेतील पात्रांना प्रेक्षकांचा निरोप द्यायला लागला आहे. आरुष बेडेकर याने बालपणीची भूमिका सहज सुंदर अभिनयाने सजग केली होती. आता ही भूमिका अभिनेता संग्राम समेळ साकारताना दिसणार आहे. मालिका लीप घेत असल्याने ही भूमिका आता संग्रामकडे आली आहे, त्यामुळे त्याच्यासाठी हे एक मोठे आव्हान ठरणार आहे. अभिनेता संग्राम समेळ याला अभिनयाचे बाळकडू घरातूनच मिळाले होते. ज्येष्ठ अभिनेते, लेखक अशोक समेळ हे संग्रामचे वडील, तर ज्येष्ठ अभिनेत्री संजीवनी समेळ संग्रामच्या आई आहेत. दोघांच्या अभिनयाचे गुण हेरून संग्रामने पुढचं पाऊल या लोकप्रिय मालिकेतून छोट्या पडद्यावर पाऊल टाकले होते. ललित २०५, कुसुम मनोहर लेले, हे मन बावरे, स्वीटी सातारकर अशा मालिका आणि चित्रपटातून त्याने प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.
स्वराज्य सौदामिनी ताराराणी मालिकेत संग्रामने छत्रपती राजाराम राजांची प्रमुख भूमिका साकारली होती. योग योगेश्वर जयशंकर मालिकेत तो आता शंकर महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. संग्रामने श्रद्धा फाटक सोबत दोन वर्ष अगोदर विवाह केला होता. त्याअगोदर त्याने अभिनेत्री पल्लवी पाटील सोबत पहिले लग्न केले होते. मात्र काही कारणास्तव दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. पल्लवी पासून घटस्फोट घेतल्यानंतर नृत्यांगना श्रद्धा फाटक सोबत तो दुसऱ्यांदा बोहल्यावर चढला. साथ सोबत या आगामी चित्रपटातून संग्राम प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे. कलर्स मराठी वाहिनीने त्याला पुन्हा एकदा प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळवून दिली आहे. योग योगेश्वर जयशंकर या नवीन मालिकेसाठी आणि दमदार भूमिकेसाठी संग्राम समेळला शुभेच्छा.