कुर्रर्र या नाटकातून अभिनेत्री विशाखा सुभेदार हिने निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले. खरं तर महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये विशाखा सुभेदाराला मानाचे स्थान होते. पण कालांतराने तिने स्वतःहूनच या शोमधून काढता पाय घेतला. यानंतर मात्र विशाखा सुभेदारवर टीका करण्यात आल्या. पण सतत त्याच त्याच भूमिका करून मला कंटाळा आला होता. आणि वेगळं काहितरी करण्याच्या दृष्टीने मी स्वतःहून हास्यजत्रा सोडली होती असे विशाखाने टीकाकारांना उत्तर दिले होते. सेल्स गर्ल ते निर्माती असा विशाखाचा क्लासृष्टीतील प्रवास फारच उल्लेखनीय ठरला आहे.
आपल्या जाडेपणामुळे बहुतेक चांगल्या भूमिकेला मुकावे लागले असे तिने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितले आहे. सध्या विशाखा सुभेदारची ही मुलाखत फारच चर्चेत आली आहे कारण या मुलाखतीत तिने प्रेम विवाह करताना कुठल्या अडचणींना पार केले याचे खुलासे केले आहेत. खरं तर त्या काळात आपण अभिनय क्षेत्रात यावं हे माझ्या घरच्यांना मुळीच मान्य नव्हतं असे तिने म्हटले आहे. या लव्हस्टोरीबद्दल विशाखा म्हणते की, काकस्पर्श या नाटकामुळे आमची भेट झाली होती. या नाटकाचा तो सह दिग्दर्शक होता. मी त्याच्यापेक्षा वयाने लहान होते त्यामुळे मी त्याला दादा म्हणायचे. एक दिवस त्याने मला दादा म्हणून नकोस असे सांगितले. सेटवर तो माझी काळजी घेत होता आणि मला ते आवडू लागलं होतं तेव्हा मी त्याला होकार कळवला होता.
विशाखाचे प्रेमप्रकरण पुढे तिच्या घरी समजले, तेव्हा तिच्या घरच्यांचा या गोष्टीला कडाडून विरोध होता. तेव्हा विशाखा सांगते की, माझ्या या लग्नाला घरातून विरोध होता. आमचं प्रेमप्रकरण घरी कळलं तेव्हा आई माझ्याशी १५ दिवस बोलत नव्हती. मला खोलीत डांबून ठेवलं होतं. एक दुजे के लिये अशीच आमची स्टोरी होती. वडिलांना तर मी नाटकात काम करणं आवडत नव्हतं. तो तर नाटकात काम करत होता त्यामुळे त्यांना ते मुळीच मान्य नव्हतं पण मग आज्जीने मला साथ दिली. तिच्या क्षेत्रातील आणि तिला आवडणाऱ्या व्यक्तीशी ती लग्न करतीये तर तुम्ही कशाला अडवताय? असे म्हणताच त्यांनी आमच्या लग्नाला परवानगी दिली. मात्र लग्नाआधी आमची मुलगी टिव्हीत दिसली पाहिजे अशी त्यांनी अट ठेवली होती.