सध्या सिनेइंडस्ट्रीत कलाकारांचे मैत्रीचे एक पाऊल पुढे टाकण्याचा ट्रेंड आला आहे. कधी एकत्र मालिका, सिनेमा करताना तर कधी पुरस्कार सोहळ्यांमध्ये परफॉर्मन्स करताना केमिस्ट्री जुळते, मग मैत्री फुलते. त्यानंतर आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचा विचार पक्का होतो. तर अशा काही जोड्यांनी गेल्या वर्षभरात संसार मांडले आहेत. तर काही जणांचा साखरपुडाही पार पडला आहे. या रोमँटीक कपल्समध्ये विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांनीही एकमेकांना प्रपोज करत वर्णी लावली आहे. सध्या हे लव्हबर्डस लग्नाआधीचे गुलाबी दिवस एन्जॉय करत आहेत. नुकताच विराजस आणि शिवानीने व्हॅलेंटाईन डे साजरा करत गिफ्ट काय हवं असे शिवानीने विराजसला विचारले.
तेव्हा विराजसने मागितलेले गिफ्ट देऊन त्याची इच्छापूर्ती कशी करायची याचा विचार करून शिवानी सध्या चांगलीच टेन्शनमध्ये आली आहे. विराजसला शिवानीकडून तात्या विंचू बाहुला हवाय, पण तो खोटाखोटा नव्हे तर खरोखरच बोलणारा तात्याविंचू मिळावा अशी त्याची इच्छा आहे. दहा वर्षापूर्वी पुण्यात डावीकडून चौथी बिल्डिंग या विराजसने लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या नाटकात शिवानीने काम केले होते. पण त्यानंतर या दोघांना एकत्र काम करण्याची संधी मिळाली नाही. एकतर दोघांचे होमटाऊन पुणे असल्याने गाठभेट व्हायची. पुढे दोघेही करिअरसाठी मुंबईत आल्यानंतर मैत्री घट्ट झाली. कधी सहज तर कधी ठरवून ही जोडी भेटू लागली.
तर या दोघांच्या चाहत्यांना या जोडीचे सोशल मीडियावरील फोटो आणि व्हिडिओ न चुकता पहायला मिळायचे. अभिनेता सिध्दार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांच्या लग्नात शिवानी आणि विराजसने कपल कॉम्बो ड्रेसिंग लूक करत त्यांच्या रिलेशनशीपवर न बोलताच शिक्कामोर्तब केलं. मैत्रीच्या पुढे आपल्यामध्ये काहीतरी फुलतय याची जाणीव झाल्यानंतर विराजसनेच प्रपोज करायचे ठरवले. गोव्यातील एका क्रूझवर रोमँटिक वातावरणात विराजसने शिवानीच्या बोटात अंगठी घातली. आता लव्हबर्ड्स म्हटल्यावर एकमेकांना गिफ्ट देण्ं तर आलेच. पण विराजसची लहानपणापासून इच्छा आहे की त्याच्याकडे एक तात्या विंचू असावा. झपाटलेला सिनेमा पाहूनच विराजसने आई मृणाल कुलकर्णी यांच्याकडे हट्ट केला होता.
खरंतर रामदास पाध्ये यांची ओळख असल्याने मुलासाठी मृणाल कुलकर्णी तात्याविंचू बाहुला बनवून घेऊ शकल्या असत्या. पण विराजसला बाहुला नव्हे तर खरा तात्याविंचू हवा होता. तेव्हापासून विराजस कोणीही गिफ्ट काय हवे तर तो खराखुरा तात्या विंचू हवा असं सांगायचा. अजूनही त्याच्या मनात ती इच्छा कुठेतरी आहेच. शिवानीनेही व्हॅलेन्टाईन डे साठी काय गिफ्ट हवंय असं विचारल्यावर विराजसने खराखुरा तात्या विंचू मागितला. आता आली का पंचाईत, खरा तात्याविंचू कुठून आणून दयायचा याचे मात्र शिवानीला टेन्शन आले आहे. अजून यांच्या लग्नाची तारीख ठरली नसली तरी ही जोडी त्यांच्या आयुष्यातील हे गुलाबी क्षण तुफान एन्जॉय करत आहेत.