मन उडू उडू झालं या झी मराठीवरील मालिकेला प्रेक्षकांकडून चांगली लोकप्रियता मिळाली होती. या मालिकेतील नायकाचा मित्र सत्तु तुम्हाला चांगलाच आठवत असेल. ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. मालिकेत सत्तुची भूमिका विनम्र भाबल याने निभावली होती. काही दिवसांपूर्वीच तो योग योगेश्वर जयशंकर या मालिकेतून विरोधी भूमिकेत दिसला होता. शुक्रवारी ८ डिसेंबर २०२३ रोजी विनम्र भाबलचा विवाहसोहळा पार पडला. पूजा नामदेव हळदणकर हिच्याशी विनम्रने लग्नगाठ बांधली. लग्नाला मन उडू उडू झालं मालिकेच्या कलाकारांनी विशेष हजेरी लावून लग्नाला रंगत आणली होती.
हृता दुर्गुळे, राजलक्ष्मी शिंदे, पूर्णिमा भावे, प्राजक्ता परब हे कलाकार त्याच्या लग्नात हजर होते. मन उडू उडू झालं या मालिकेमुळेच या कलाकारांची छान गट्टी जमली होती, ती त्यांनी आजही टिकवून ठरवलेली पाहायला मिळाली. विनम्र भाबल हा गेली अनेक वर्षे मराठी सृष्टीत कार्यरत आहे. विनम्र भाबल हा मूळचा देवगडचा. मुंबई युनिव्हर्सिटी मधून पदवीचे शिक्षण घेत असताना त्याने रंगभूमीवर एकांकिकामधून काम करण्यास सुरुवात केली. परंतु मनासारखे कुठे काम मिळत नव्हते. दरम्यान नाट्यशिबिरातून लेखक दिग्दर्शक असलेल्या संभाजी सावंत यांच्याशी ओळख झाली. त्यांनी मोलाचे मार्गदर्शन देत डेंगो या मालवणी नाटकात छोटीशी भूमिका देऊ केली. परंतु पुढे जाऊन व्यावसायिक नाटकात किमान छोटी तरी भूमिका मिळावी अशी ईच्छा चित्रगंधा नाटकातून पूर्ण झाली.
पुढे मंगेश कदम दिग्दर्शित करत असलेल्या बेईमान या नाटकात प्रथमच झळकण्याची नामी संधी चालून आली. एकांकिकेतून काम करत असल्याने मंदार देवस्थळी एका स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम सांभाळत होते. त्यांनीच विनम्रला कुठलीही ऑडिशन न घेता माझे पती सौभाग्यवती या मालिकेत मोठी भूमिका देऊ केली. या मालिकेमुळे विनम्रला अमाप लोकप्रियता मिळाली. फुलपाखरू, मोरूची मावशी, स्वीटी सातारकर, रेडू, ये रे येरे पैसा अशा मालिका, नाटक आणि चित्रपटातून विनम्रने अनेक महत्वपूर्ण भूमिका साकारल्या. मन उडू उडू झालं मालिकेतील त्याने साकारलेला सत्तू प्रेक्षकांची विशेष पसंती मिळवताना दिसला. विनम्र भाबल आणि पूजा हळदणकर या दोघांनाही आयुष्याच्या या नवीन वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.