दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गेल्या १६ दिवसांपासून ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र अवयव निकामी झाल्याने ते उपचाराला प्रतिसाद देत नव्हते. आज २६ नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाले ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने मराठी सृष्टीत एक मोठी पोकळी निर्माण झाली अशा भावना मोठमोठ्या कलाकारांनी व्यक्त केल्या आहेत. रोहिणी हट्टंगडी, अश्विनी भावे ते अगदी अश्विनी महंगडे, अमोल कोल्हे यांनी देखील त्यांच्या निधनाच्या बातमीवर शोक व्यक्त केला. अभिनयाचं विद्यापीठ आपण गमावून बसलो ह्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.
विक्रम गोखले यांनी आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीत विविधांगी भूमिका निभावल्या. कळत नकळत, वजीर, नटसम्राट या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचं मोठं कौतुक करण्यात आलं. अश्विनी भावे यांनी त्यांच्यासोबत विविध चित्रपटातून काम केलं होतं. आज आपण एक अद्वितीय अभिनेता आणि एक सह्रीदयी माणूस गमावला. त्यांच्या जाण्याने कला क्षेत्राचे खूप मोठं नुकसान झाले आहे, जे कधीही भरून काढता येणार नाही. विक्रम गोखले म्हणजे आमच्या पिढीसाठी अभिनयाची शाळाच होती. माझ्या करिअरमधील तीन उत्तम आणि गाजलेल्या कलाकृतींमध्ये पार्टनर मालिका, कळत नकळत आणि वजीर सिनेमा विक्रमजींसोबत काम करण्याची संधी मला मिळाली. त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकता आल्या; त्यांच्या अनेक आठवणी कायम माझ्यासोबत असतील! अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
विक्रम गोखले यांच्या निधनानंतर त्यांचे पार्थिव बालगंधर्व रंगमंदिर येथे ठेवण्यात आले होते. संध्याकाळी ६ वाजता वैकुंठ स्मशानभूमीवर पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विक्रम गोखले यांच्यासोबतच्या काही खास आठवणी कलाकार मंडळी शेअर करताना पाहायला मिळाली. महत्वाचं म्हणजे त्यांच्या मुलाखतीतला एक किस्सा सध्या व्हायरल होत आहे. विलासराव देशमुख आणि विक्रम गोखले हे कॉलेजपासूनचे मित्र होते. गरवारे कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना दोघांत मैत्री झाली होती. विक्रम गोखले यांना अभिनयाची आवड होतीच, पण राजकारणात देखील त्यांना रस असायचा. तर विलासराव देशमुख यांना राजकारणाची आणि कलेची देखील आवड होती. दोघांच्याही आवडी जुळून आल्याच्या कारणामुळे त्यांच्यातील मैत्री अगदी घट्ट विणत गेलेली दिसली.
अर्थात पुढे जाऊन या दोघांनी आपापले मार्ग समर्थपणे निवडले असले तरीही मैत्रीमुळे हे कायम एकमेकांना भेटत असत. गरवारे कॉलेजमध्ये असताना विलासराव देशमुख यांच्याकडे जावा गाडी होती. अनेकदा हे दोघेही गाडीवर बसून फेरफटका मारायला जायचे. याच गाडीवर बसून असेच एकदा हे दोघे चक्क मैत्रिणीच्या घरीही पोहोचले होते. ही आठवण विक्रम गोखले यांनी एका मुलाखतीत सांगितली होती. कलाविश्व आणि राजकारण क्षेत्रातील हे दोघेही दिग्गज आज हयात नसले तरी त्यांच्या आठवणींना मात्र उजाळा मिळाला आहे.