मराठी चित्रपट सृष्टीचा एक काळ गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विलास रकटे यांना गेल्या काही दिवसांपासून आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सांगली येथील कामेरी या गावात ते आपले जीवन व्यतीत करत आहेत. शासनाकडून जुन्या कलाकारांना पेन्शन दिली जाते. मात्र या २५०० रुपयांच्या तुटपुंज्या पेन्शनमध्ये जीवन कसं जगायचं असा प्रश्न त्यांच्यापुढे आ वासून उभा आहे. कारण विलास रकटे यांना आता वयोपरत्वे चालणे देखील कठीण होऊ लागले आहे. त्यात आजारपण आणि उपचारांचा खर्च कसा भागवायचा असे मोठे प्रश्न त्यांच्यापुढे आहेत. त्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी मोठे प्रयत्न सुरु आहेत. त्यांच्या आर्थिक अडचणींची मीडियाच्या माध्यमातून दखल घेण्यात आली.
नुकताच विलास रकटे यांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यानिमित्ताने त्यांच्याबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात. विलास रकटे यांना त्यांच्या गावात बापू म्हणूनच हाक मारली जाते. कामेरी गावातच त्यांचे बालपण गेले. उंच आणि धिप्पाड शरीरयष्टीमुळे त्यांनी कुस्ती क्षेत्रातही नशीब आजमावले होते. मोठमोठ्या कुस्तीगीरांसोबत त्यांनी कुस्ती खेळली होती. अशातच गावातील जत्रेत ते मित्रांसोबत नाटक सादर करत असत, यातूनच त्यांचं चित्रपट सृष्टीत पाऊल पडलं. सामना, खुर्ची सम्राट, चांडाळ चौकडी, तुमचं आमचं जमलं, गनिमीकावा, सर्वसाक्षी, सुळावरची पोळी, जखमी वाघीण, प्रतिकार अशा अनेक चित्रपटातून त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या. खलनायक, नायक ते चरित्र अभिनेते असा प्रवास करत असताना त्यांनी काही चित्रपट दिग्दर्शित सुद्धा केले.
तरुण वयात विलास रकटे यांनी राजकीय मंचावर भाषणं देखील गाजवली होती. त्यावेळी यशवंतराव चव्हाण यांनी त्यांच्या झंझावाती भाषणाचे मोठे कौतुक देखील केले होते. ते राहत असलेल्या कामेरी गावात पाण्याची भीषण समस्या होती. विलास रकटे यांनी पुढाकार घेऊन गावाचा पाण्याचा प्रश्न मिटवला होता. पंचायत समितीचे सदस्य म्हणूनही ते निवडून आले होते. अभिनय, दिग्दर्शन, सामाजिक आणि राजकीय अशा विविध क्षेत्रात विलास रकटे यांनी काम केलं आहे. क्रांतीपर्व या चित्रपटाची स्क्रिप्ट त्यांनी लिहून ठेवली आहे. अन्याय, प्रतिकार, प्रतिडाव या चित्रपटांचे लेखन त्यांनी केले आहे. अशाच धाटणीवर क्रांतीपर्व हा चित्रपट यावा अशी त्यांची मनापासून ईच्छा आहे. विलास रकटे यांची ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण होवो आणि त्यासाठी त्यांना चांगला निर्माता मिळो हीच एक सदिच्छा.