धर्मेंद्र हे हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते म्हणून ओळखले जातात. जवळपास २५० हुन अधिक चित्रपटातून त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत. सध्या ते अभिनय क्षेत्रात सक्रिय नसले तरी वयाच्या ८७ व्या वर्षी देखील त्यांचा काम करण्याचा उत्साह मात्र भल्या भल्याना लाजवेल असाच आहे. धर्मेंद्र यांचा जन्म पंजाब मधील लुधियाना जवळील नसराली या गावचा. वयाच्या १९ व्या वर्षीच त्यांनी प्रकाश कौर यांच्यासोबत लग्नाची गाठ बांधली होती. ६० च्या दशकात त्यांनी आपल्या अभिनयाची कारकीर्द सुरू केली. बॉयफ्रेंड, शादी, बंदिनी, पूजा के फुल, शोले, गुड्डी, राजा राणी, चुपके चुपके, धर्मवीर अशा अनेक चित्रपटातून त्यांच्या दमदार अभिनयाचे मोठे कौतुक झाले.
दरम्यान ८० च्या दशकात हेमा मालिनी सोबत त्यांनी दुसरे लग्न केले. आता घर संसारातून, अभिनय क्षेत्रापासून बाजूला होऊन ते लोणावळा येथील फार्म हाऊसमध्ये आरामात आपले जीवन जगत आहेत. लोणावळामध्ये जवळपास १०० एकर परिसरात धर्मेंद्र यांची शेती आहे. या डोंगराळ खडकाळ भागात त्यांनी आलिशान घर सुद्धा बांधलेलं आहे, जिथे सर्व सुविधा उपलब्ध आहेत. या घरात स्विमिंगपूल आणि वेगवेगळ्या फुलांनी सजलेला बगीचा सुद्धा आहे, जो या फुलांनी सगळ्यांचे लक्ष्य वेधून घेत असतो. या फार्महाऊसला लागूनच गाई, म्हशीचे गोठे देखील आहेत. जेव्हा कधी त्यांना उदासपणा जाणवतो तेव्हा ते या गोठ्यात येऊन गाई, म्हशींसोबत गप्पा मारत वेळ घालवत असतात. धर्मेंद्र यांच्याकडे फिरण्यासाठी एक खास गाडी सुद्धा आहे.
आपल्या १०० एकर परिसरात व्यापलेल्या शेताची पाहणी करण्यासाठी ते ह्या गाडीतून फेरफटका मारत असतात. त्यांच्या या जागेत एक छोटंसं तळं देखील आहे त्यात काही बदकं स्वच्छंद विहार करताना दिसतात. सेंद्रिय शेतीतून त्यांनी आजवर विविध फळं, फुलं, भाजीपाला, धान्य यांचे सुद्धा पीक घेतले आहे. ज्या खडकाळ जमिनीत काहीच येण्याची शक्यता नव्हती त्या जमिनीसाठी अपार मेहनत घेऊन शेती पिकाऊ बनवली आहे. नुकतेच त्यांनी मोहरीचे पीक घेतले होते आणि त्याचे तेल सुद्धा बनवले होते. शेतात काम करण्यासाठी त्यांनी काही स्थानिक लोकांच्या हाताला काम मिळवून दिले आहे. या मजुरांसोबत आता त्यांचं एक भावनिक नातं सुद्धा बनलेलं आहे. त्यांच्यासोबत अनेकदा ते हितगुज करताना दिसतात.
स्ट्रगलच्या काळात म्हणजेच १९६० मध्ये त्यांनी खरेदी केलेली पहिली फियाट गाडी याच फार्म हाऊसमध्ये त्यांनी सजवून ठेवली आहे. ही आठवण कायम आपल्यासोबत राहावी अशी त्यांची ईच्छा आहे. अनेकदा धर्मेंद्र यांची मुलं, पत्नी त्यांना भेटायला फार्महाऊसवर येत असतात. या वयात सुद्धा धर्मेंद्र डोंगर रस्त्यावर गाडी चालवतात, स्विमिंग आणि व्यायाम सुद्धा करतात. त्यांचा हाच उत्साह आजही अनेक तरुणांना लाजवेल असाच आहे.