दोन आठवड्यापूर्वी शाहरुखचा मुलगा आर्यनला अटक झाली होती, पण रोज नवनवीन कारणांमुळे नेटकरी शाहरुखला लोकांचे दाखले देत चांगले वडील होण्याचा सल्ला देत आहेत. अगदी जगप्रसिद्ध सेलिब्रिटी जॅकी चॅनचे उदाहरण दिल्यानंतर आता नेटकरी आर माधवनचा मुलगा वेदांत माधवनचे कौतुक करताना दिसत आहेत. एकीकडे शाहरुखला बॉलिवूड मधून साथ मिळत असली तरीही गाजलेला अभिनेता माधवन आपल्या मुलावर योग्य संस्कार घडवून देशाचा गौरव वाढविताना दिसत आहे; या दोन्हींची होणारी तुलना विचार करायला लावणारी आहे. त्यातच आज एक विशेष कारणही तसेच घडले..
बेंगलोर येथे वेदांतने ४७ व्या ज्युनियर नॅशनल एक्वाटिक चॅम्पियनशिपमध्ये ८०० आणि १५०० मीटर फ्री स्टाईल, १०० आणि २०० मीटर रिले मधून ४ रौप्य पदके आणि १००, २०० व ४०० मीटर फ्रीस्टाईल मधून ३ कांस्य पदकांचे घवघवीत यश संपादित केले आहे. त्याचे हे वैयक्तिक पदकांचे यश आगामी ऑलम्पिक स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. वेदांतच्या सोळाव्या वाढदिवसा प्रित्यर्थ माधवने भावनिक पोस्ट लिहून शुभेच्छा दिल्या होत्या, तो म्हणतो “आयुष्यात मी जे काही चांगले केले त्या सर्व गोष्टींवर तू मात केल्याचा मला हेवा वाटतो, माझे हृदय अभिमानाने फुलते, त्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद. मला तुझ्याकडून खूप सारे शिकायचे आहे. तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवत असताना, मी तुला १६ व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो. अशी आशा आणि प्रार्थना करतो की आम्ही तुला जे काही देऊ शकलो आहोत त्यापेक्षा तुझे योग्य स्थान तू या जगात बनवू शकशील. तुझा पिता असल्याचा मला अभिमान आहे.”
आर माधवन सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो, सिनेमा आणि कुटुंबाबद्दल बऱ्याच सकारात्मक गोष्टी तो मांडतो. नुकतीच डी वाय पाटील एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर द्वारे डॉक्टर ऑफ लेटर्स पदवी प्रदान केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली होती. त्याचप्रमाणे मुलाने स्विमिंग मध्ये कमालीची प्रगती केली आहे त्याबद्दलही तो सतत अपडेट देत राहतो. सासरे बुवांसोबत रक्षाबंधन निमित्त काढलेला एक फोटो आयर्न प्रकरणामुळे खूप व्हायरल झाला ज्यात माधवन आणि वेदांत वैदिक पूजेसाठी पारंपरिक वेशभूषेत पाहायला मिळाले. आपली संस्कृती आचार विचार यांचे आचरण करणारा हा फोटो खूपच बोलका आहे. या अगोदर एशियन जलतरण स्पर्धेमध्ये देखील वेदांतने सांघिक रौप्यपदक पटकावीत भारताला मानाचे स्थान प्राप्त करून दिले होते. जलतरण स्पर्धेमधून आज संपादन केलेले वेदांताचे हे यश या सर्वांत आणखीन भर घालत आहे.