कुत्रा , मांजर असे प्राणी पाळणे व त्यांची जोपासना करणे हे आता शहरी भागात सर्रासपणे पाहिलं जातं. मात्र अनेकांची ही आवड बाहेरगावी, कामाच्या ठिकाणी जायच्यावेळी मोठी अडचणीची ठरते. अशा वेळी प्राण्यांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांना नातेवाईकांच्या घरी मित्रांच्या घरी ठेवण्याच्या उपाययोजना आखल्या जातात. पण बहुतेक जण ही जबाबदारी घ्यायला नाकं मुरडतात, अशा वेळी आपल्या प्राण्यांची देखभाल कोण करणार? असा प्रश्न अनेकांना पडतो. अर्थात आजकाल यावर अनेकांनी तोडगा काढण्याचा प्रयत्न केलेला आहे.
लहान मुलांसाठी जसे पाळणाघर चालवले जातात तशाच पद्धतीने प्राण्यांसाठी देखील शहराच्या ठिकाणी चालवली जातात. आपल्या पाळीव प्राण्यांची काळजी घेतली जाईल याची शाश्वती असल्याने प्राण्यांचे पालक देखील निश्चिंत होऊन प्रवासाला जातात. अशीच एक गरज ओळखून मराठमोळी अभिनेत्री आपले प्राणिप्रेम जपत पाळणाघराची जबाबदारी सांभाळत आहे. ही अभिनेत्री आहे वल्लरी लोंढे. वल्लरी सध्या सोनी टीव्हीवरील अहिल्याबाई होळकर या हिंदी मालिकेत पार्वतीची भूमिका साकारत आहे. कन्नी या आगामी चित्रपटातून ती मोठ्या पडद्यावर पाऊल टाकत आहे. कॉलेजमध्ये असल्यापासूनच वल्लरीने नाटकात काम केले होते. नृत्याचीही तिला विशेष आवड आहे, २०१९ साली श्रावण क्वीन सौंदर्य स्पर्धेची ती विजेती ठरली होती.
वल्लरीचे वडील विराज लोंढे हे मराठी चित्रपट निर्माते म्हणून ओळखले जातात. नागराज मंजुळे यांच्या नाळ चित्रपटाची त्यांनी निर्माते म्हणून काम केले होते. श्रावण क्वीन ठरलेल्या वल्लरीने हळूहळू अभिनय क्षेत्रात देखील आपला जम बसवलेला पाहायला मिळतो. मात्र यासोबतच ती प्राणिप्रेम देखील जपताना दिसत आहे. वल्लरीची आई वैशाली लोंढे या शालीबर्ड्स नावाने पाळणाघर चालवतात. फक्त पाळीव प्राण्यांसाठीच नाही तर अगदी गरुड, बगळे, सरडे यांसारखे दुखापत झालेले प्राणी पक्षी त्यांच्याकडे आश्रयाला येतात. जखमी झालेले प्राणी पक्षी त्या आपल्या पाळणाघरात आणतात. त्यांची व्यवस्थित काळजी घेऊन औषधोपचार करतात. जेव्हा हे पक्षी पुन्हा ठणठणीत बरे होतात तेव्हा खुल्या आकाशात त्यांना सोडून देण्यात येते.
वल्लरीचे बालपण देखील याच प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या सहवासात गेले आहे. त्यामुळे केवळ कुत्रा आणि मांजरच नाही तर अगदी बगळे, गरुड, सरडे यांचा तिला आता छान लळा लागला आहे. असे बरेचसे पाळीव प्राणी, पक्षी त्यांच्या पाळणाघरात आश्रयाला येतात. यानिमित्ताने वल्लरीने एक खास व्यवसाय देखील सुरू केलेला आहे. कुत्र्यांसाठी तिने बाथ अँड बार्क्स नावाने सलून देखील चालू केले आहे. त्यांच्या या पाळणाघराला नागरिकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. अभिनेत्री म्हणून वल्लरी सोशल मीडियावर सतत सक्रिय असली तरी तिची ही दुसरी बाजू देखील आता तिच्या चाहत्यांना आवडली आहे.