दूरदर्शनवरील उडाण या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री कविता चौधरी यांचे काल १५ फेब्रुवारी रोजी दुःखद निधन झाले आहे. कविता चौधरी या ६७ वर्षाच्या होत्या. १९८९ सालच्या उडाण या दूरदर्शनवरील लोकप्रिय मालिकेत त्यांनी आयपीएस अधिकारी कल्याणी सिंहची भूमिका गाजवली होती. हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने कविता चौधरी यांचे निधन झाले आहे. आज शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अमृतसर येथील शिवपुरी मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची धाकटी बहीण कांचन चौधरी भट्टाचार्य ही पोलीस ऑफिसर आहे. कविता चौधरी यांनी ९० च्या दशकात दुरदर्शनवरील मालिका नायिका म्हणून गाजवल्या होत्या.
अभिनयासोबतच त्यांनी निर्मिती क्षेत्रातही पाऊल टाकले होते. नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा मधून कविता चौधरी यांनी अभिनयाचे धडे गिरवले होते. ज्येष्ठ अभिनेते अनंग देसाई यांच्यासोबत त्या तिथे शिकायला होत्या. अनंग देसाई यांनीच कविता चौधरी यांच्या निधनाची बातमी जाहीर करत एक हरहुन्नरी कलाकार गमावल्याची खंत व्यक्त केली आहे. कविता चौधरी यांनी १९८१ पासून अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. अपराधी कौन, उडाण, युअर ऑनर अशा मालिकांमधून त्या दुरदर्शनवर झळकल्या होत्या. आयपीएस डायरीज या शोचे त्यांनी सूत्रसंचालन केले होते. पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे एक दमदार नायिका अशी त्यांची ओळख बनली होती. ८० च्या दशकात सर्फ डिटर्जंटची एक ऍड टीव्हीवर पाहायला मिळाली होती.
कविता चौधरी यांना त्यात झळकण्याची संधी मिळाली होती. उडाण या मालिकेत सतीश कौशिक, विक्रम गोखले, उत्तरा बावकर, शेखर कपूर या कलाकारांच्या महत्वाच्या भूमिका होत्या. या मालिकेने कविता चौधरी यांना मोठी लोकप्रियता मिळाली होती. त्यानंतरच्या काळात महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेसाठी त्या विशेष ओळखल्या जाऊ लागल्या होत्या. दुरदर्शनवरचा एक प्रसिद्ध चेहरा अशी त्यांची आजही ओळख आहे. पण गेल्या काही दिवसांत त्यांनी अभिनय क्षेत्रातून काढता पाय घेतलेला पाहायला मिळाला. अमृतसर येथे त्या वास्तव्यास होत्या. अभिनेते अनंग देसाई हे कविता चौधरी यांच्या संपर्कात होते. त्यांच्या अशा अचानक निधनाच्या बातमीने हिंदी सृष्टीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. एक हरहुन्नरी अभिनेत्री गमावल्याची खंत प्रेक्षक देखील व्यक्त करत आहेत.