मकरंद अनासपुरे आणि मेधा मांजरेकर यांची प्रमुख भूमिका असलेला “दे धक्का” हा चित्रपट प्रदर्शित झाला होता २००८ साली. त्यातील “उगवली शुक्राची चांदणी…” हे गाणं देखील खूपच लोकप्रिय झालं होतं हे गाणं बालकलाकार “गौरी वैद्य” हिच्यावर चित्रित झालं होतं. गौरीने दे धक्का चित्रपटात मकरंदच्या मुलीची म्हणजेच सायलीची भूमिका साकारली होती. तर सक्षम कुलकर्णी याने सायलीच्या भावाची भूमिका बजावली होती. आज चित्रपट प्रदर्शित होऊन १३ वर्षे लोटली आहेत मात्र चित्रपटातील इतर कलाकारांप्रमाणे गौरी पुढे कुठल्याच चित्रपटात पाहायला मिळाली नाही. आज गौरी कुठे आहे आणि ती काय करते? याबाबत जाणून घेऊयात…
दे धक्का या चित्रपटा अगोदर गौरी वैद्यने २००३ साली “हेडा होडा” या बॉलिवूड चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात तिने साकारलेली निरागस लक्ष्मी खूपच भाव खाऊन गेली होती. शिवाजी साटम आणि सुहासिनी मुळ्ये हे दोन्ही मराठमोळे कलाकार या बॉलिवूड चित्रपटात झळकले होते. त्यामुळे शिवाजी साटम यांच्यासोबत तिची जुळून आलेली केमिस्ट्री दे धक्का चित्रपटातून पुन्हा एकदा अनुभवायला मिळाली. दे धक्का हा तिने बालकलाकार म्हणून अभिनित केलेला दुसरा चित्रपट ठरला या मराठी चित्रपटानंतर गौरी शिक्षणाच्या आईचा घो या आणखी एका मराठी चित्रपटात झळकली. सक्षम कुलकर्णी आणि गौरी वैद्य या दोघांची दोन्ही चित्रपटातली भावा बहिणीची जोडी प्रेक्षकांना खूपच भावली. मात्र या एक दोन चित्रपटानंतर गौरी कुठल्याच चित्रपट किंवा मालिकेत फारशी पाहायला मिळाली नाही. अभिनया व्यतिरिक्त गौरीला नृत्याची विशेष आवड होती हे तिने साकारलेल्या नृत्यावरूनच समजते. २०११ सालच्या “एका पेक्षा एक जोडीचा मामला” या रिऍलिटी शोमध्ये ती पुन्हा एकदा दिसली यात ती पुन्हा एकदा सक्षम कुलकर्णी सोबतच झळकली. त्यामुळे चित्रपटातील भावा बहिणीच्या जोडीने तोपर्यंत तरी एकमेकांची साथ सोडली नव्हती. गौरी या मोजक्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली मात्र मधल्या काळात ती अभिनयापासून खूप दूर गेलेली पाहायला मिळत आहे.
गौरीने मधल्या काळात आपले शिक्षण पूर्ण करण्यावर अधिक भर दिलेला पाहायला मिळतो. डी जी रुपारेल या कॉलेजमधून तिने आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले असून Watumull Institute मधून तिने इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग अँड कम्प्युटर टेकनॉलॉजीची पदवी प्राप्त केली आहे. गौरी आज साधारण २५ वर्षांची झाली असली तरी तिने लग्न केले आहे की नाही याबाबत अधिक माहिती कुठेच उपलब्ध नाही आणि शिवाय ती सोशल मीडियावर देखील फारशी सक्रिय नसल्याने तिच्याबाबत अधिक माहिती मिळणे कठीण आहे. परंतु तरी देखील ही शुक्राची चांदणी मराठी सृष्टीत यापुढेही झळकली तरी प्रेक्षक तिचे आपुलकीने स्वागत करतील हे वेगळे सांगायला नको…