तू तेव्हा तशी या मालिकेत सौरभ आणि अनामीकाचे लग्न व्हावे म्हणून माई मावशी सतत प्रयत्न करताना दिसत आहेत. आपल्या बहिणीच्या मृत्यू पश्चात तिच्या मुलाची म्हणजेच सौरभची ती नेहमी काळजी घेताना दिसते. वल्ली तिच्या स्वार्थासाठी सौरभकडून सतत पैसे उकळत असते. त्याला नेहमी त्रास देते हे माईमावशी जाणून आहेत. त्यामुळे वल्लीला वठणीवर कसं आणायचं याचं गमक माई मावशींना चांगलेच उमगले आहे. आणि म्हणूनच सौरभच्या पाठीशी खंबीरपणे उभी असणारी ही खमकी माई मावशी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. माई मावशींची भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री उज्वला जोग यांनी निभावली आहे. आज त्यांच्या रिअल लाईफ बद्दल थोडंसं जाणून घेऊयात.
उज्वला जोग या अनेक वर्षांपासून मराठी सृष्टीत कार्यरत आहेत. नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही क्षेत्रात त्यांनी छान काम केले आहे. नुकत्याच येऊन गेलेल्या पावनखिंड या चित्रपटात त्यांनी बाजीप्रभू देशपांडे यांच्या मातोश्री बयोबाई देशपांडे ही दमदार व्यक्तिरेखा साकारली होती. कुंकू लावते माहेरचं, नवरा बायको, सौभाग्य कांकन, कन्यादान, जाऊ तिथे खाऊ. हम बने तुम बने, झिम्मा, मित्राची गोष्ट अशा चित्रपट, मालिका तसेच नाटकांमधून सोज्वळ तर कधी विनोदी भूमिका साकारल्या आहेत. सूर्याची पिल्ले, ढोल ताशे, लुका छुपी हि, शांतेचं कार्ट चालू आहे त्यांनी अभिनित केलेली गाजलेली नाटकं आहेत. उज्वला जोग या प्रसिद्ध अभिनेते अनंत जोग यांच्या पत्नी आहेत.
अनंत जोग यांनी मराठी तसेच हिंदी सृष्टीत खलनायकी ढंगाच्या भूमिका साकारल्या आहेत. विशेष म्हणजे या भूमिकांमुळे त्यांच्या घरातील कामवाली बाई देखील त्यांना घाबरून असायची ही आठवण त्यांनी नुकतेच किचन कल्लाकरच्या मंचावर सांगितली होती. अनंत जोग हे अभिनेत्री शांताबाई जोग यांचे चिरंजीव होय. अभिनयाचा वारसा त्यांना त्यांच्या आईकडूनच मिळाला असे म्हणायला हरकत नाही. त्यांची मुलगी क्षिती जोग ही देखील उत्कृष्ट अभिनेत्री आहे. दामिनी मालिकेत क्षितीने इन्स्पेक्टरची भूमिका गाजवली होती. गंध फुलांचा गेला सांगून, तू तिथे मी या मराठी तसेच घर की लक्ष्मी बेटियां, साराभाई साराभाई, ये रिश्ता क्या केहलाता है या हिंदी मालिकातही तिने उत्तमोत्तम भूमिका साकारल्या आहेत.
मराठी अभिनेता दिग्दर्शक हेमंत ढोमे याच्याशी क्षिती विवाहबद्ध झाली. सिनेसृष्टीत ही हसतमुख जोडी कायम चर्चेत असते. उज्वला जोग यांनी मालिका चित्रपटांमधून गंभीर तसेच विनोदी अशा विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. तू तेव्हा तशी या मालिकेत त्यांना असेच एक मनोरंजनात्मक पात्र साकारण्यास मिळाले आहे. माई मावशी सौरभच्या भविष्याच्या काळजीत आहेत. अनामिकासोबत त्याचे लग्न झाल्यास ती त्याचा संसार सुखाचा करेल असा विश्वास त्यांना आहे. त्यामुळे माई मावशींचे पात्र प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरलेले पाहायला मिळते. या भूमिकेसाठी उज्वला जोग यांना मनःपूर्वक शुभेच्छा.