सेलिब्रिटी विश्वात रोज नवनवीन घडामोडी घडत असतात. प्रेक्षकांकडुन ट्रोल होणं असो अथवा त्यांच्या टीकेला उत्तर देणं असो, या गोष्टी तर वारंवार चर्चेचा विषय ठरतात. अशातच गेल्या काही दिवसांपासून मराठी सेलिब्रिटींना ‘ड्रेसवाली’ या नावाने अकाउंट असलेल्या व्यक्तीकडून मेसेजेस येऊ लागले होते. ही व्यक्ती बऱ्याचशा सेलिब्रिटींना मेसेजेस पाठवून त्यांच्याशी संपर्कात राहू पाहत होती. ही ड्रेसवाली आपल्याला असे मेसेजे का करतीये म्हणून सेलिब्रिटींनी तिच्याशी केलेले चॅट सर्वांच्या निदर्शनास आणून दिले होते. ड्रेसवाली अकाउंटवर असलेला चेहरा विरहित फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत होता. या फोटोवरून लोकांनी ही अदिती द्रविड असावी असा अंदाज लावला.
पण अदितीने देखील असे मेसेजेस शेअर केल्यामुळे ही ड्रेसवाली नेमकी कोण आहे असा प्रश्न अनेकांना पडला. यावरचा खुलासा २२ एप्रिल रोजी करणार असे तिने सांगितले होती. त्यानुसार अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर तिने यावरचा पडदा हटवला. ही ड्रेसवाली दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री अदिती द्रविड आहे हे अनेकांना समजले. पण अदितीने असे का केले याचाही उलगडा यात झालेला पाहायला मिळतो. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अदिती द्रविड हिने ‘ड्रेसवाली’ या नावाने कपड्यांचा ब्रँड बाजारात आणला आहे. चाहत्यांचे तसेच सेलिब्रिटींचे लक्ष्य वेधून घेण्यासाठीच तिने आपल्या ब्रँडच्या प्रमोशनसाठी ही अनोखी शक्कल लढवली होती. सेलिब्रिटी विश्वात एकाच क्षेत्रावर अवलंबून नाही राहिले पाहिजे असे मत अनेकदा व्यक्त केले जाते.
त्यानुसार बरेचसे सेलिब्रिटी कपड्यांच्या आणि हॉटेल व्यवसायात उतरण्याचे धाडस दाखवतात. याच युक्तीनुसार अदिती द्रविड हिने देखील कपड्यांच्या व्यवसायात उतरण्याचे ठरवले आहे. अदिती द्रविड ही गेल्या अनेक वर्षांपासून मराठी सृष्टीशी जोडली गेलेली आहे. माझ्या नवऱ्याची बायको मालिकेने तिला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली होती. त्यानंतरही ती छोट्या मोठ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिली. सुंदरा मनामध्ये भरली याही मालिकेतील तिच्या भूमिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. पण स्वतःचा काहीतरी व्यवसाय असावा या दृष्टीने तिने ड्रेसवाली नावाने ब्रँड बाजारात उपलब्ध करून दिला आहे. व्यवसायानिमित्त सेलिब्रिटींनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.