मराठी बिग बॉसच्या प्रत्येक सिजनमध्ये प्रेमाचे वारे वाहताना दिसले आहेत. बिग बॉसच्या चौथ्या सिजनमध्ये देखील असे प्रसंग थोड्या फार प्रमाणात प्रेक्षकांना जाणवले. सुरुवातीलाच त्रिशूल मराठे आणि तेजस्विनी लोणारी यांच्यात छान बॉंडिंग जुळले. दोघेही नाशिकचे असल्याने त्यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध तयार झाले. मात्र त्यानंतर त्यांच्यात प्रेम जुळेल अशी आशा वाटत असतानाच त्यांच्यातील मैत्रीचे नाते देखील संपुष्टात आले. त्रिशूल हा अभिनय क्षेत्रात नसला तरी मॉडेलिंग मध्ये त्याने चांगले यश मिळवले. कालांतराने त्याची मैत्री समृद्धी जाधव सोबत झाली. दोघेही एकमेकांना पसंत करू लागले.
मात्र हे दोघेही जसे बिग बॉसच्या घराबाहेर पडले तसे त्यांच्यातील प्रेमाची ही चर्चा आपोआपच संपुष्टात आली. मध्यंतरी विशाल निकम, आरोह वेलणकर, राखी सावंत आणि मीरा जगन्नाथ यांनी चॅलेंजर्स म्हणून घरात एन्ट्री केली. तेव्हा अमृता धोंगडे आणि विशालच्या नवीन प्रेमकहाणीला सुरुवात झाली. दोघांनी एकत्रित गाण्यावर डान्स केल्यामुळे आणि अगोदर चित्रपटात काम केल्यामुळे हीच विशालची सौंदर्या आहे असा समज प्रेक्षकांनी करून घेतला. अर्थात त्यानंतर विशाल घराबाहेर पडला तेव्हा त्याने आपलं मन अजूनही घरातच अडकलंय असे म्हटले होते. मात्र आता बिग बॉसच्या घरात आणखी एक प्रेम कहाणी नव्याने फुलताना पहायला मिळाली आहे. तेजस्विनीने नुकतीच बिग बॉसच्या घरात पुन्हा एकदा एन्ट्री केली होती.
त्यावेळी तेजस्विनी पहिल्यांदा प्रसाद जवादेला भेटली. तुळशीच्या पाया पडायला जाताना तिने पायातले सँडेल्स काढून ठेवले, तेव्हा प्रसादने ते उलटे पडल्याचे पाहून पुन्हा सरळ केले. एका निवांत क्षणी बोलत असताना या दोघांनाही आपले अश्रू अनावर झाले. तेजस्विनी टॉप ५ मध्ये डीझर्व्ह करत होती हे प्रसादने यावेळी बोलून दाखवले तेव्हा दोघेही डोळ्यात पाणी दाटून बोलू लागले. तेजस्विनीला टास्कमध्ये दुखापत झाली तेव्हा ही गोष्ट तिने सगळ्यात अगोदर प्रसादला सांगितली होती. त्यादरम्यान तो तिला नीट खेळ असेही सूचित करत होता. मात्र आता तिचा हात पूर्णपणे बरा झाल्याचे पाहून तो खुश झाल्याचे तिला सांगतो. दरम्यान तेजस्विनी आता फक्त आपल्याला भेट द्यायला आली आहे हे जाणून तो तिला निरोप देताना खूपच भावुक झाला.
घरातील इतर सदस्यांच्या तुलनेत तेजस्विनीने आपला बराचसा वेळ प्रसाद सोबत घालवला. बिग बॉसच्या घरातील हे क्षण खूप अविस्मरणीय आहेत असे म्हणत तिने हा क्वालिटी टाइम पुन्हा एकदा प्रसाद सोबत स्पेण्ड केला. दोघांमध्ये अबोल प्रेम आहे हे त्यांच्या नजरेत स्पष्ट दिसत होते, अशी मतं प्रेक्षकांनी व्यक्त केली आहेत. त्यामुळे प्रसाद आणि तेजस्विनीचे नाते मैत्रीच्याही पुढे गेलेले त्यांच्या चाहत्यांनाच नव्हे तर बिग बॉसच्या प्रेक्षकांना देखील जाणवले. बिग बॉसच्या सीजन चार नंतर ही जोडी पुन्हा एकत्र पाहायला मिळो अशी आशा प्रेक्षकांनी व्यक्त केली आहे.