मराठी कलाकारांना चित्रपट मालिकांमधून काम करत असताना चांगले मानधन मिळते याची प्रचिती दरवेळी प्रत्ययास येते. मालिकेतून काम करत असताना आर्थिक दृष्ट्या स्थिरस्थावर होऊन कार खरेदी करणे ह्या गोष्टी आता सर्रासपणे पाहायला मिळतात. मात्र लक्झरी कार खरेदी करणे हे सामान्य कलाकारांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट असते. पण हे स्वप्न सत्यात उतरवून दाखवले आहे प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने. तेजस्विनी पंडित हिने आग बाई अरेच्चा या चित्रपटातून मराठी सृष्टीत पाऊल टाकले होते. या पहिल्याच चित्रपटात तिने खलनायिकेची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे तिला अशाच धाटणीच्या भूमिका मिळतील अशी अपेक्षा होती.
मात्र तसे न घडता तिने मराठी चित्रपटातून नायिका तसेच सहाय्यक भूमिका साकारल्या. मी सिंधुताई सपकाळ या चित्रपटाने तेजस्विनीला चांगली लोकप्रियता मिळाली. आई ज्योती चांदेकर हिच्या पावलावर पाऊल टाकत तेजस्विनीने मराठी सृष्टीत स्वतःची वेगळी ओळख बनवली. रानबाजार वेबसिरीजमधून तिच्या बोल्ड भूमिकेची चर्चा झाली. सनी या आगामी चित्रपटातून तेजस्विनी पंडित सहनिर्माती म्हणून प्रेक्षकांच्या समोर येत आहे. अभिनय, व्यवसाय आणि आता निर्मिती क्षेत्रात ती चांगला जम बसवताना दिसत आहे. चंदेरी दुनियेत स्थिरस्थावर झाल्यावर प्रत्येकाची काहीना काही तरी एक ईच्छा असते. तेजस्विनीची देखील अशीच एक ईच्छा नुकतीच पूर्ण झाली आहे. XUV700 ही लक्झरी कार खरेदी करून तिने आपले स्वप्न पूर्ण केले आहे.
खरं तर लक्झरी कार खरेदी करणे ही माझी हौस नव्हती तर ती एक गरज होती असे तिने म्हटले आहे. भारतीय बनावटीच्या महिंद्राच्या या कारची किंमत ३० लाखांच्या घरात जाते. ही लक्झरी कार मी स्वतःला गिफ्ट केली आहे असे म्हणत तेजस्विनीने यामागच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. ती म्हणते, माझ्या आयुष्यातला हा आनंदाचा क्षण तुमच्याबरोबर share करतेय. माझी स्वतःची नवीन कार. माझ्यासाठी कार ही कधीच luxury नव्हती, necessity होती. पण मी स्वतःला एक luxurious कार गिफ्ट करू शकले ह्यासाठी आत्ता मनात फक्त कृतज्ञता आहे. आजपर्यंत खूप प्रवास केला. पण एक मात्र पक्कं ठरलंय माझं. आता नुसता प्रवास नाही करायचा, आता प्रवासाची “मज्जा लुटायची.” आई, दीदी आणि आजपर्यंतच्या प्रवासात नेहमीच माझ्या बरोबर असणारा माझा “बाबा”, तुमच्या आशिर्वादामुळेच हे शक्य झालं.