हिंदी बिग बॉसचा १५ वा सिजन जिंकल्यानंतर तेजस्वी प्रकाश हिला तब्बल दोन चित्रपटांची ऑफर आली. मन कस्तुरी रे चित्रपटातून ती अभिनय बेर्डे सोबत स्क्रीन शेअर करताना दिसली. यातूनच तिचे मराठी सृष्टीत पदार्पण झाले असे म्हणायला हरकत नाही. कारण तेजस्वीचा अभिनित केलेला हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला. या चित्रपटानंतर तेजस्वी पुन्हा एकदा मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्कुल कॉलेज आणि लाईफ हा तिचा आणखी एक मराठी चित्रपट येत्या १४ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. तेजस्वी या चित्रपटातून करण परब सोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. सोबत जितेंद्र जोशी, वनिता खरात, प्रसाद जवादे महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

शाळा कॉलेजच्या जीवनावर भाष्य करणारा हा चित्रपट अचानक ट्विस्ट घेतो आणि कथानकाची थरार दृश्यात कायापालट होते. असे हे कथानक असलेला स्कुल कॉलेज आणि लाईफ चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल अशी आशा आहे. चित्रपटातून रोहित शेट्टी प्रथमच मराठी चित्रपट निर्मिती क्षेत्रात उतरत आहे. रोहित शेट्टी आणि मराठी कलाकारांचे एक समीकरणच तयार झालेलं आहे. रोहितच्या अनेक चित्रपटात त्याने मराठी कलाकारांना अभिनयाची संधी मिळवून दिली आहे. मराठी कलाकारांना चित्रपटात घेण्यामागे त्याचे एक कारण आहे. मराठी कलाकार हे कुठल्याही परिस्थितीशी जुळवून घेतात. त्यांना अभिनयाची उपजत जाण असते. त्यामुळे मी मराठी कलाकारांना माझ्या चित्रपटात घेतो असे तो हास्यजत्रेच्या मंचावर म्हणाला होता. त्यावेळी रोहितने तमाम मराठी प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती.

याच कारणामुळे रोहित शेट्टी आता मराठी चित्रपट निर्मितीकडे वळला आहे. स्कुल कॉलेज आणि लाईफ हा त्याचा निर्माता म्हणून पहिलाच मराठी चित्रपट आहे. रोहित सोबत पवित्र गांधी आणि विवेक शाह यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन विहान सूर्यवंशी याने केले आहे. तेजस्वी प्रकाश हिंदी बिग बॉसच्या शोमुळे चांगलीच प्रकाश झोतात आली. शोनंतर एकता कपूरने नागीन मालिकेत संधी दिली होती. मराठमोळी मुलगी म्हणून तिला मराठी चित्रपटात झळकण्याची संधी मिळाली. मन कस्तुरी रे हा तिचा अभिनित केलेला पहिला तर स्कुल कॉलेज आणि लाईफ हा दुसरा मराठी चित्रपट आहे. चित्रपटाचा ट्रेलर आज प्रेक्षकांच्या भेटीला आला असून प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. तर रोहित शेट्टी चित्रपटाची निर्मिती करणार म्हणून प्रेक्षक अधिकच खुश झाले आहेत.