ज्येष्ठ अभिनेत्री तसेच बॉलिवूड अभिनेत्री काजोलची आई तनुजा यांना काल रविवारी संध्याकाळी मुंबईतील जुहू मधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. १७ डिसेंबरच्या संध्याकाळी तनुजा यांना वृद्धापकाळाने आलेल्या समस्यांमुळे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे वृत्त समजताच कलाविश्वात त्यांच्याबद्दल काळजी व्यक्त करण्यात येत आहे. तनुजा सध्या ८० वर्षांच्या आहेत. त्यामुळे आरोग्याच्या कारणास्तव जुहू रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये त्यांना दाखल करण्यात आले असल्याचे सांगितले जाते.
“सध्या त्या डॉक्टरांच्या एका टीमच्या निरीक्षणाखाली आहेत. उपचाराला त्या उत्तम प्रतिसाद देत आहेत. काळजी करण्यासारखे काही नाही,” असे त्यांच्या प्रकृतीबाबत सांगितले जात आहे. तनुजा या लोकप्रिय अभिनेत्रीने अनेक हिंदी, मराठी तसेच बंगाली चित्रपटांमध्ये काम केले आहे. मराठी अभिनेत्री शोभना समर्थ आणि निर्माते कुमारसेन समर्थ यांची ती कन्या होय. तनुजाचा जन्म कुमारसेन समर्थ आणि अभिनेत्री शोभना समर्थ यांच्या पोटी झाला. भारत मिलाप मध्ये शोभना यांनी सीतामातेची भूमिका गाजवली होती. नूतन आणि तनुजा या त्यांच्या दोन्ही मुली अभिनेत्री म्हणून लोकप्रिय झाल्या. त्यांच्या अभिनयाचा हा वारसा तनुजाच्या मुली काजोल आणि तनिषा मुखर्जी या दोघींनीही पुढे चालू ठेवलेला पाहायला मिळतो.
नूतन यांचा मुलगा मोहनीश बहल हा देखील एक सुप्रसिद्ध अभिनेता आहे. तनुजाने १९५० मध्ये बहीण नूतनच्या ‘हमारी बेटी’ या चित्रपटातून बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर त्या एक यशस्वी अभिनेत्री बनल्या. बहारें फिर भी आएंगी, ज्वेल थीफ, हाथी मेरे साथी मेरे जीवन साथी, घर द्वार, जीने की राह यांसारख्या चित्रपटांमधील दमदार भूमिकांसाठी त्या ओळखल्या जातात. पितृऋण, उनाड मैना, गुलछडी, झाकोळ अशा मराठी चित्रपटातही त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. पितृऋण या चित्रपटाची मागणी म्हणून त्यांनी डोक्यावरचे पूर्ण केसकर्तन केले होते. या भूमिकेला न्याय देण्यासाठी त्यांनी हा त्याग केला होता. सध्या त्या अभिनय क्षेत्रापासून दूर आहेत.
पण नवरात्रीच्या कौटुंबिक उत्सव सोहळ्यात त्या आवर्जून हजेरी लावताना दिसतात. ह्या वयातला त्यांचा हा उत्साह अजूनही दांडगा असलेला पहायला मिळतो. त्याचमुळे त्यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी अशी प्रार्थना केली जात आहे आणि सुदृढ जीवनासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.