झी मराठी वरील नवा गडी नवं राज्य या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. आनंदी आणि राघवची जुळून आलेली केमिस्ट्री प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. या मालिकेत टग्याचे पात्र देखील विशेष लक्ष्यवेधी ठरले आहे. टग्यामुळे मालिकेला एक वेगळाच रंग चढतो, त्यामुळे हे पात्र प्रेक्षकांना हवेहवेसे वाटत आहे. आनंदी रिक्षातून पडली तिला हाताला दुखापत झाली हे कळताच हा टग्या पुन्हा एकदा कर्णीकांच्या घरी आला आहे. त्यामुळे टग्या आणि चिंगी दोघेही आनंदीचे डॉक्टर बनून तिची काळजी घेत आहेत. एकामागून एक येणारी ही सर्व संकटं पाहून आबांनी मात्र शांती करायचे ठरवले आहे.

मालिकेत बऱ्याच प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा हा टग्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. टग्याची मालवणी आणि त्याचा बिनधास्तपणा श्रीपादने त्याच्या अभिनयाने उत्तम निभावला आहे. आज श्रीपाद बद्दल माहिती नसलेल्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात. टग्याची भूमिका बालकलाकार श्रीपाद पडवळ याने साकारली आहे. श्रीपाद हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील घोणसरी गावचा आहे. श्रीपाद सेंट अर्सला शाळेत चौथी इयत्तेत शिकतो. शाळेच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रनातून श्रीपाद नेहमी सहभाग दर्शवतो. नवा गडी नवं राज्य ही त्याने साकारलेली पहिलीच मालिका आहे. मालिकेमुळे घोणसरी गावचा बालकलाकार छोट्या पडद्यावर झळकतोय याचा अभिमान गावकऱ्यांना आहे. टग्या मालवणी खूप छान बोलतो, त्यामुळे मालिकेच्या प्रेक्षकांना तो नेहमी हवाहवासा वाटतो.

सेटवर आनंदी, राघव, चिंगी सगळ्यांसोबत त्याची छान गट्टी जमली आहे. मालिकेत तो जितका बोलका दाखवला आहे तितकाच खऱ्या आयुष्यात देखील अगदी तसाच आहे. चिंगी म्हणजेच साईशा भोईर हिला त्याने मालवणी शिकवली आहे. दोघांची सेटवर खूप धमाल मस्ती चालत असते. श्रीपादचे सिन असतात तेव्हा गावावरून येताना काही ना काही भेटवस्तू आणतो. श्रीपाद सेटवर आल्यावर तिथलं वातावरण आनंदी करून टाकतो. त्यामुळे कलाकारांना सुद्धा त्याच्यासोबत काम करताना खूप धमाल येते. श्रीपाद पडवळ याला टग्याच्या भूमिकेने मोठी लोकप्रियता मिळत आहे. या मालिकेचा तो श्वास आहे, अशी भावना प्रेक्षक व्यक्त करतात. त्यामुळे टग्या मालिकेत असला की त्याला पाहायला मज्जा येते हि भावना व्यक्त केली जात आहे. या भूमिकेसाठी श्रीपाद पडवळ या बालकलाकाराला अनेकानेक शुभेच्छा.