झी मराठी वाहिनी आणि श्वेता शिंदे ह्यांचं एक अतूट नातं बनत चाललं आहे. लागीरं झालं जी या मालिकेच्या यशानंतर निर्माती श्वेता शिंदे हिने देवमाणूस, मिसेस मुख्यमंत्री, देवमाणूस २, अप्पी आमची कलेक्टर या एका मागून एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या. देवमाणूस मालिकेला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला किरण गायकवाड सारख्या तगड्या कलाकाराची साथ मिळाल्याने ही मालिका यशाचे शिखर गाठताना दिसली. देवमाणूस २ मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. चला हवा येऊ द्या च्या मंचावर हा निरोप समारंभ साजरा करण्यात आला होता त्यावेळी मालिकेच्या टीमने हजेरी लावली होती.
मालिका विश्वात निरोप समारंभ सारखी गोष्ट प्रथमच घडली असल्याने प्रेक्षकांचे हे प्रेम पाहून श्वेता शिंदे खूप भारावून गेलेली पाहायला मिळाली. झी मराठी वाहिनीसोबतच्या आठवणी जाग्या करत श्वेता शिंदे हिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या वाहिनीने दाखवलेला विश्वास आणि त्यांनी दिलेला भक्कम आधार यामुळेच मी हे आव्हान पेलू शकले असे तिने म्हटले आहे. माझ्या निर्मिती क्षेत्रातल्या कारकिर्दीतील हा खरा टर्निंग पॉईंट ठरला. श्वेता शिंदे म्हणते की, नेहमी एखाद्या मालिकेचं, नाटकाचं, चित्रपटाचं प्रमोशन करण्यात येणाऱ्या, सर्वांच्या लाडक्या ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये आज पहील्यांदाच एका मालिकेचा निरोप समारंभ साजरा केला जाणार आहे. एका निर्मातीला आणि काय हवं? इतकं प्रेम, इतका लळा. देवमाणूस ह्या मालिकेद्वारे आम्हाला आज तुमचा निरोप घेताना ऊर भरून आलाय.
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर एक असा टर्निंग पॉइंट येतो जो आपल्याला खूप काही देऊन जातो. देवमाणूस आणि देवमाणूस २ ह्या मालिका म्हणजे माझ्या आणि वज्र प्रोडक्शन्सच्या कारकिर्दीतील खरा टर्निंग पॉइंट ठरल्या. १०:३० च्या स्लॉटला स्वतःच वेगळं अस्तित्व निर्माण करत. कधी प्रेक्षकांचा रोष तर कधी प्रेक्षकांचे भरभरून प्रेम आम्ही अनुभवले. झी मराठी वाहिनीचा भक्कम आधार, मालिकेतील सर्वच गुणी कलाकारांचे आणि तांत्रिक विभागाचे सहाय्य आणि मायबाप प्रेक्षकांच्या आशीर्वादानेच इतका मोठा पल्ला पार करू शकलो. यापुढे देखील वज्र प्रॉडक्शन्स ‘अप्पी आमची कलेक्टर’ आणि यांसारख्या एकापेक्षा एक सरस कलाकृती घेउन येईल आणि तुमचे मनोरंजन करत राहील याची मी खात्री देते. निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी, चुकले आमचे काही, त्याची क्षमा असावी!