मराठी सृष्टीतील अनेक कलाकार मंडळी लग्नासाठी जोडीदार म्हणून याच क्षेत्रातील कलाकाराची निवड करतात. या क्षेत्रात येणाऱ्या अडचणी या कलाकारांना चांगल्या अवगत असल्याने एकमेकांना समजून घेण्यासाठी ते हा निर्णय घेत असतात. स्वाती देवल आणि तुषार देवल हे कलाकार जोडपं गेल्या अनेक वर्षांपासून मराठी सृष्टीत कार्यरत आहे. तुषार उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक तर स्वाती उत्कृष्ट विनोदी अभिनेत्री म्हणून परिचयाची झाली आहे. २६ ऑक्टोबर २००३ मध्ये या दोघांनी प्रेम विवाह केला होता. स्वाती एका नाटकाच्या इंटरव्ह्यूसाठी गेली होती तिथेच तुषार येणाऱ्या कंटेस्टंटची नोंदणी करत असे.
स्वाती ज्यावेळी इंटरव्ह्यूसाठी आली त्यादिवशी तुषार मात्र गैरहजर राहिला होता. नाटकाच्या तालमीला निवडलेल्या नावांमध्ये स्वाती हे नाव अनोळखी वाटल्याने स्वाती नेमकी कोण असावी? हा प्रश्न त्याला वारंवार पडायचा. शेवटी ती स्वाती त्याला सापडली आणि पाहताक्षणी तो प्रेमात पडला. अनेकदा त्याने स्वातीला मी तुला आवडतो का? असा प्रश्न विचारला. यावर स्वाती नेहमी त्याला म्हणायची की, हो! तू माझा खूप चांगला मित्र आहेस. पण योग्य उत्तर न मिळाल्याने त्याने एकदा स्वातीला खिडकीबाहेर काहीतरी असल्याचे खुणावत असताना तिला घट्ट मिठी मारली. जवळपास ४ ते ५ मिनिटं तुषारने स्वातीला आपल्या मिठीत घेतले होते. त्यानंतर तुषारसोबत लग्नासाठी तिने आपला होकार कळवला.
कारण स्वातीचा असा गैरसमज होता की, ज्या मुलाने आपल्याला मिठी मारली आता त्याच्याशीच लग्न करावे लागणार. तुषारच्या आई या शाळेत संगीत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. त्यामुळे संगीताची आवड त्याला लहानपणापासूनच लागली होती. तुषारचे लग्न झाल्यानंतर आईने त्यांना वेगळा संसार थाटण्याचा सल्ला दिला. अर्थात दोघेही स्वतःच्या पायात उभे राहावेत म्हणून आईचा हा निर्णय त्यांनी लगेचच स्वीकारला. दरम्यान भाड्याच्या घरात राहत असताना अनेकदा पसारा उचलणे कठीण होत गेले. स्ट्रगलच्या काळात तुषार आपल्या जवळ सगळी वाद्य सोबत घेऊन जायचा. अनेकदा ट्रेनमधून जात असताना ही वाद्य सोबत नेताना त्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असे. त्यामुळे आपल्या कामाच्या ठिकाणी स्वतःचं घर असावं अशी दोघांची इच्छा होती.
सोयीच्या दृष्टीने दोघांनी मिळून घराची शोधाशोध केली. दहिसरला त्यांना एक घर आवडले आणि बुक करण्यासाठी त्यांनी टोकन म्हणून ११ हजारांची रक्कम दिली. त्यानंतर त्याच दाराजवळ उभे असताना तुषारला ई टीव्ही मधून ज्ञानेश भालेकर यांचा फोन आला. कॉमेडी एक्सप्रेस नावाच्या सिरीलसाठी तुषारची संगीत दिग्दर्शक म्हणून निवड करण्यात आली होती. ही ऑफर तुषारने लगेच स्वीकारली. घर बुक करताच त्यांना ही आनंदाची बातमी मिळाली. पुढे या घराने दोघांनाही भरभरून काम मिळवून दिले, प्रसिद्धी मिळवून दिली असे स्वाती आणि तुषार दोघेही म्हणतात.