स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी श्रीमती संजीवनी करंदीकर यांचे आज सकाळी वयाच्या ८४ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या त्या आत्या तर कीर्ती फाटक यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या निधनाने ठाकरे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. संजीवनी करंदीकर या बाळासाहेब ठाकरे यांच्या धाकट्या भगिनी होत्या. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये त्यांनी जवळपास ३८ वर्षे मशीन सेक्शन अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या जाण्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिलेला पाहायला मिळाला.
संजीवनीताईंच्या माध्यमातून प्रबोधनकारांच्या तसेच बाळासाहेबांच्या अनेक वैयक्तिक आठवणींना उजाळा मिळायचा. त्यांच्या निधनाने बाळासाहेबांच्या भावंडातील अखेरचा दुवा निखळला आहे. ठाकरे व करंदीकर कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी असून हे दु:ख सहन करण्याची शक्ती त्यांच्या परिवाराला मिळो. संजीवनीताईंच्या आत्म्यास सद्गती लाभो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संजीवनी करंदीकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. प्रबोधनकार ठाकरे यांना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी संजीवनी करंदीकर या सातव्या क्रमांकावर तर बाळासाहेब ठाकरे हे पाचव्या क्रमांकावर होते. या आठ अपत्यांपैकी संजीवनी करंदीकर एकमेव हयातीत होत्या.
वृद्धापकाळाने आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली आहे. संजीवनी ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या अनेक आठवणी शेअर केल्या होत्या. बाळासाहेब ठाकरे आणि आमच्यात ६ वर्षांचे अंतर, आमच्या घरात नेहमीच शिस्तीचे पालन केले जायचे. आम्हा सर्वांनाच वाचनाची भयंकर आवड असायची. अशा आठवणी त्या नेहमी सांगत असत. अगदी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्या खूपच खुश झाल्या होत्या. मीडिया माध्यमातून त्यांची याबाबतची प्रतिक्रिया देखील अधोरेखित करण्यात आली होती. कीर्ती फाटक या त्यांच्या कन्या चित्रपट सेनेच्या पदाधिकारी म्हणून ओळखल्या जातात. संजीवनी करंदीकर यांच्या दुःखद निधनाने ठाकरे कुटुंबात शोकाकुल वातावरण आहे.