मराठी मालिका, मराठी चित्रपट तसेच अनेक दर्जेदार कार्यक्रम महाराष्ट्रातच नाही तर, देशात आणि जगाच्या पाठीवर पोहोचवण्याचे काम स्वप्नील जोशीला करायचे आहे. त्यासाठी लवकरच तो ओटीटी माध्यम मराठीतून येण्यासाठी प्रयत्न करत आहे. या नव्या वर्षात आपल्या मित्रांच्या मदतीने ‘वन ओटीटी’ या नावाने स्वप्नील जोशी एक प्रादेशिक माध्यम सुरू करत आहे. यातून चित्रपट, वेबसिरीज, मालिका, नाटकासाठी एक मोठे व्यासपीठ मिळू शकेल. यानिमित्ताने स्वप्नील जोशीने एक मुलाखत दिली. स्वप्नीलने मराठी चित्रपट, नाटक तसेच मालिकांना प्रेक्षकांनी आपलेसे करावे असे म्हटले आहे.
याबद्दल बोलताना स्वप्नील म्हणतो की, प्रत्येक मराठी चित्रपट, नाटक, मालिका यावर मराठी प्रेक्षकांनी प्रेम करावे. पॉपकॉर्न महाग वाटत असतील तर खाऊ नका, घरूनच जेवून जा पण मराठी चित्रपट हे चित्रपटगृहात जाऊनच बघा. आजवर मराठी माणसांनी मराठी नाटकावर प्रचंड प्रेम दाखवलं आहे. त्याचमुळे आजही मराठी नाटक चिरतरुण आहे आणि कायम राहील. माणसाचा रक्तगट ए बी ओ असतो मात्र मराठी माणसाचा रक्तगट हा नाटक आहे. आजकाल नाटक, चित्रपटातून वेगवेगळे प्रयोग होत आहेत, त्याच्या पाठीशी तुम्ही खंबीर उभे रहा असे आवाहन तो प्रेक्षकांना करतो आहे. चित्रपट मालिकेतून आपण ज्या भूमिका करतो त्या कधी कधी मनाला पटत नाहीत. मात्र एक अभिनेता म्हणून मला त्या भूमिका पूर्णत्वास नेणे गरजेचे असते.
दिग्दर्शकाच्या म्हणण्यानुसार मला त्या तशा उभ्या कराव्या लागतात. हे माझं काम आहे आणि ते मी इमानदारीने करतो. बालपणी साकारलेल्या कृष्णाची भूमिका साकारत असताना सेटवर अनेकजण पाया पडण्यासाठी येत होते. पण आपल्या पेक्षा मोठी लोकं पाया पडतायेत हे पाहून त्याला खूप अवघडल्यासारखं व्हायचं. त्यामुळे तो आपले पाय मागे घ्यायचा. मात्र जेव्हा ही गोष्ट रामानंद सागर यांच्या लक्षात आली, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की लोकं तुझ्या पाया पडत नाहीत. तर तू साकारलेल्या भगवान श्रीकृष्णाच्या पाया पडायला येतात. ज्या वयात पालकांनी पाल्यावर संस्कार घडवायचे असतात, त्या वयात तू या जगावर संस्कार करत आहेस हे लक्षात ठेवून ही भूमिका कर. त्यांचे हेच शब्द मी आचरणात आणले, त्यामुळे माझ्या भूमिकेचे खूप कौतुकही झाले.