मराठी कला विश्वात गेल्या काही दिवसांपासून लग्नसोहळ्यांना उधाण आले आहे. अशातच प्रसिद्ध अभिनेत्रींची लगीनघाई देखील पाहायला मिळत आहे. काल अभिनेत्री गौतमी देशपांडे आणि अभिनेत्री स्वानंदी टिकेकर यांच्या मेंदीचा सोहळा अगदी थाटात पार पडलेला पाहायला मिळाला. स्वानंदी टिकेकर आणि गौतमी देशपांडे या दोन प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी लगीनघाई सुरू झालेली आहे. आज २५ डिसेंबर रोजी एकाच दिवशी या दोघी विवाहबद्ध होणार आहेत. स्वानंदी टिकेकर हिच्या लग्नाची लगबग गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होती.

आशिष कुलकर्णी सोबत साखरपुड्याच्या बातमीनंतर स्वानंदी डिसेंबर महिन्यात लग्न करणार हे तिने जाहीर केले होते. तर गेल्या काही दिवसांपासून तिच्या केळवणाचे थाट देखील सजलेले पाहायला मिळाले. काल स्वानंदीने आशिषच्या नावाची मेंदी तिच्या हातावर सजवली होती. आज त्यांच्या हळदीचा सोहळा पार पडणार आहे. स्वानंदी आणि आशिष पुण्यात लग्न करत आहेत तर गौतमी देशपांडे हिने काल अचानकपणे स्वानंद तेंडुलकर सोबतच्या लग्नाची बातमी सोशल मीडियावर शेअर केलेली पाहायला मिळाली. त्याअगोदर आदल्या दिवशी मृण्मयीने त्या दोघांचे केळवण साजरे केले होते. तर शनिवारी गौतमीने तिच्या हातावर स्वानंदच्या नावाची मेंदी सजवली. यावेळी मृण्मयी देशपांडे हिने खणाचा ड्रेस परिधान करून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

मृण्मयी तिच्या धाकट्या बहिणीच्या लग्नात खूपच उत्साही दिसत होती. एरवी या दोघी एकत्र आल्यानंतर गमतीने खूप भांडताना पाहायला मिळतात. पण गौतमीच्या लग्नात तीच आता पुढाकार घेऊन तिच्या लग्नाची तयारी करू लागली. आज स्वानंदी टिकेकरसह गौतमीचीही हळद पार पडणार आहे. त्यामुळे मराठी सेलिब्रिटींनाही त्यांच्या लग्नात जाण्याची उत्सुकता लागून राहिली आहे. दरम्यान ही दोन्ही लग्न पुण्यातच पार पडणार असल्याने कलाकारांना हे दोन्ही लग्न अटेंड करता येणार आहेत. आता या लग्नात स्वानंदी आणि गौतमीचा लूक नेमका कसा असणार याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांमध्ये आहे. दरम्यान वर्षाच्या शेवटी ही दोन्ही लग्न गाजणार हे मात्र नक्की.