सध्या मराठी सृष्टीत कलाकारांची लगीनघाई पाहायला मिळत आहे. येत्या काही दिवसातच अभिनेता प्रसाद जवादे आणि अभिनेत्री अमृता देशमुख यांच्या लग्नाचा बार उडणार आहे. तर नुकतेच सारेगमप लिटिल चॅम्प्स फेम मुग्धा वैशंपायण आणि प्रथमेश लघाटे यांचा साखरपुडा संपन्न झाला. तर तू चाल पुढं मालिका फेम अभिनेता ध्रुव दातार आणि अक्षता तिखे यांच्याही लग्नाची जोरदार तयारी सुरू झालेली आहे. यासोबतच प्रसिद्ध अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि गायक आशिष कुलकर्णी यांच्याही लग्नाची लगबग सुरू झालेली आहे.
नुकतेच या दोघांचे पहिलेवहिले केळवण अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी मोने यांच्या घरी पार पडले.खरं तर सुकन्या कुलकर्णी सोबत स्वानंदीने तिची पहिली मालिका केली होती. स्वानंदी जेव्हा शाळेत होती तेव्हा तिने आभाळमया या मालिकेत सुकन्या कुलकर्णी सोबत काम केले होते. त्यानंतर मंजिरी भावे यांच्या अग अग सुनबाई काय म्हणता सासूबाई या मालिकेत दोघी पुन्हा एकत्र पाहायला मिळाल्या. यात त्या सासू सुनेच्या भूमिकेत झळकल्या होत्या. सुबोध भावेची पत्नी मंजिरी भावे, मालिकेचा नायक संचित चौधरी, दिग्दर्शक वैभव चिंचाळकर आणि सुकन्या कुलकर्णी यांनी एकत्र येऊन स्वानंदी आणि आशिषचे हे केळवण साजरे केले. जुलै महिन्यात स्वानंदी आणि आशिषचा साखरपुडा संपन्न झाला होता.
डिसेंबर महिन्यात दोघे लग्न करणार अशी माहिती उदय टिकेकर यांनी एका मुलाखतीत दिली होती. आशिष पुण्याचा आहे आणि आमचं घर देखील पुण्यात आहे त्यामुळे हे लग्न पुण्यातच होणार असे उदय टिकेकर यांनी सांगितले होते. त्यामुळे स्वानंदी आणि आशिषच्या लग्नाच्या खरेदीची लगबग सुरू झालेली पाहायला मिळत आहे. त्यात आता जवळच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या केळवणाची जोरदार तयारी सुरू केलेली आहे. स्वानंदी आणि आशिष दोघांनाही संगीताची विशेष आवड आहे. अशाच एका प्रसंगी दोघांची पहिली भेट घडून आली. आमचं ठरलं असे म्हणत स्वानंदीने आशिष सोबत असलेल्या प्रेमाची कबुली सोशल मीडियावर जाहीर केली होती. त्यानंतर लगेचच दोघांचा साखरपुडा पार पडला होता. आता त्यांच्या लग्नाच्या सोहळ्याचा थाट पाहण्यासाठी प्रेक्षकही तेवढेच उत्सुक आहेत.