२१ सप्टेंबर रोजी अभिनेता अखिल मिश्रा यांचे वयाच्या ५८ व्या वर्षी अपघाती निधन झाले आहे. त्यांनी आमिर खानच्या थ्री इडियट्स मध्ये लायब्ररीयन दुबेची भूमिका साकारली होती. उतरन, धत तेरे की, दो दिल बंधे एक डोरी से, डॉन, गांधी माय फादर, करिब अशा बॉलिवूड चित्रपटातून काम केले होते. अखिल मिश्रा हे त्यांच्या घरात किचनमध्ये काम करत असताना स्टुलावर उभे राहिले होते. अशातच त्यांचा तोल गेला आणि ते खाली कोसळले. त्यात त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार बसला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अखिल मिश्रा यांना रुग्णालयात दाखल केले.
उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अखिल मिश्रा यांची पत्नी सुझान बर्नर्ट या शुटिंग निमित्त हैद्राबादला गेल्या होत्या. अखिल यांच्या निधनाची बातमी कळताच सुझान यांना मोठा धक्का बसला. सुझान बर्नर्ट या मूळच्या जर्मनीच्या. तिथे वयाच्या १९ व्या वर्षी त्यांनी थिएटर जॉईन केले होते. तीन वर्षे अभिनयाचे धडे गिरवल्यानंतर त्या भारतात आल्या. २००४ सालापासून सुझान यांनी मराठी, बंगाली सह बॉलिवूड चित्रपटातून काम केले आहे. ३ फेब्रुवारी २००९ मध्ये अभिनेता अखिल मिश्रासोबत त्यांनी लग्नगाठ बांधली. पण पुन्हा ३० सप्टेंबर २०११ मध्ये त्यांनी पारंपारिक पद्धतीने पुन्हा लग्न केले. सुझान बर्नर्ट यांनी मराठीतील अनेक लोकप्रिय मालिका तसेच चित्रपटातून काम केले आहे.
गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा, उंच माझा झोका, पालखी, दुसऱ्या जगातील, ठण ठण गोपाळ, आंबट गोड, कालाय तस्मे नमः अशा मराठी मालिका आणि चित्रपटातून सुझानने फॉरेनरच्या भूमिका निभावल्या आहेत. याशिवाय २०११ साली ढोलकीच्या तालावर या रिऍलिटी शोमध्ये सुझानने डान्स परफॉर्मन्स सादर केला होता. सुझान आणि अखिल या दोघांनी काही मोजक्या प्रोजेक्टमधून एकत्र काम केले होते. अखिल यांचे १९८३ साली अभिनेत्री मंजू सोबत पहिले लग्न झाले होते. पण १९९७ साली मंजू मिश्रा यांचे दुःखद निधन झाले. काही वर्षाने अखिल यांची सुझान सोबत ओळख झाली, या ओळखीचे पुढे प्रेमात आणि नंतर लग्नात रूपांतर झाले. अखिल मिश्रा यांनी बॉलिवूड तसेच हिंदी मालिका सृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. त्यांच्या निधनाच्या बातमीने हिंदी सृष्टीत मोठी हळहळ व्यक्त करण्यात आली.