झी मराठी वाहिनी टीआरपीच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून नवनवे उपक्रम राबवत आहे. नुकतेच या वाहिनीने सारं काही तिच्यासाठी या मालिकेतून दोन बहिणींच्या दुराव्याची कथा प्रेक्षकांच्या समोर आणली. त्याला अल्पावधीतच खूप चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. तर नवा गडी नवं राज्य या मालिकेच्या प्रसारणाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. येत्या २५ सप्टेंबर पासून नवा गडी नवं राज्य ही मालिका रात्री ८.३० वाजता प्रसारित केली जाणार आहे.
मालिकेत यासोबतच रंजक ट्विस्ट देखील आणले जाणार आहेत. रमाशिवाय ही मालिका अपूर्ण आहे. रमा या मालिकेत होती तेव्हा मालिकेचा टीआरपी वाढला होता. मात्र आता लवकरच रमा एका नव्या रूपातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राघव आणि आनंदीचा संसार आता हळूहळू खुलू लागला आहे. त्यांच्या आयुष्यात आता चिमुकल्या परीचे आगमन होणार आहे. मालिकेच्या या नव्या ट्विस्टमध्ये रमा प्रेग्नंट दाखवली आहे. आनंदी आणि राघवच्या आयुष्यात येणारी ही चिमुरडी आता रमाच्या रूपात काय धमाल घडवून आणणार हे पाहणे रंजक ठरणार आहे. येतीये हं मी, असे म्हणत ही रमा आता लवकरच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे.
मालिकेचा हा नवीन प्रोमो प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा ठरला आहे. मालिका एवढे दिवस शांत शांत होती. पण आता रमाच्या एंट्रीने ही मालिका परिपूर्ण होईल असे प्रेक्षकांनी मत व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. रमाशिवाय ही मालिका अपूर्ण होती, रमाच या मालिकेला पुन्हा एकदा टीआरपी मिळवून देऊ शकते अशी प्रतिक्रिया आता प्रेक्षकांनी देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे रमाच्या भूमिकेत आता कोणती बालकलाकार दिसणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तूर्तास मालिकेच्या या ट्विस्टमुळे प्रेक्षक पुन्हा एकदा या मालिकेकडे वळणार हे निश्चित आहे.