अमर प्रेम या मालिकेतून सुयश टिळकने छोट्या पडद्यावर एन्ट्री केली होती. पुढचं पाऊल या मालिकेमुळे सुयश प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला होता. मात्र दुर्वा या मालिकेमुळे सुयश मुख्य नायकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला. का रे दुरावा, बाप माणूस, सख्या रे, शुभमंगल ऑनलाइन या त्याने साकारलेल्या मालिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. गेल्या वर्षी आयुषी भावे सोबत सुयशने लग्नगाठ बांधली होती. आयुषी नृत्यांगना आहे मात्र अभिनय क्षेत्राचीही तिला विशेष ओढ आहे. नुकताच आलेल्या तमाशा लाईव्ह या चित्रपटात ती झळकली होती. मैत्रीच्या नात्यावर भाष्य करणाऱ्या रूपनगर के चिते या आगामी चित्रपटात ती महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे

येत्या १६ सप्टेंबर २०२२ रोजी चित्रपट प्रदर्शित होईल असे जाहीर करण्यात आले आहे. आयुषीचा दुसरा चित्रपट रिलीज होण्याअगोदर तिने हिंदी मालिका सृष्टीत पदार्पण केलेले पाहायला मिळणार आहे. येत्या २२ ऑगस्ट पासून स्टार प्लस या हिंदी वाहिनीवर संध्याकाळी ७ वाजता ‘रज्जो’ ही नवी मालिका प्रसारित केली जात आहे. या मालिकेत आयुषी रज्जोची प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे. रज्जो ही गरिबीत वाढलेली मुलगी, आपली आई नदीतून जे काही मिळवेल त्यावर त्यांचे पोट भरते. तर रज्जो देखील आर्थिक हातभार लागावा म्हणून वस्तू विकते. इथेच तिची भेट श्रीमंत घरच्या अर्जुनशी होते. गरिबी आणि श्रीमंतीची दरी रज्जो कशी कमी करते याची कहाणी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

अभिनेता राजविर सिंग हा आयुषी सोबत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. सेलेस्टी बैरागी रज्जोच्या बालपणीची भूमिका साकारणार आहे. तर तरुणपणाच्या भूमिकेत आयुषी भावे दिसणार आहे. सेलेस्टी बैरागी ही आलिया भट्टची डुप्लिकेट असल्याचे बोलले जाते. याचमुळे तिचे मालिकेत पदार्पण करण्यात आले. गूनगुन उपरारी, पाखी हेगडे, सिद्धार्थ वासुदेव हे कलाकार देखील या मालिकेचा भाग असणार आहेत. दिग्दर्शिका, निर्माती मुक्ता धोंड या मालिकेची धुरा सांभाळणार आहे. रज्जो मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या नव्या मालिकेमुळे आयुषीच्या चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव करत शुभेच्छा दिल्या आहेत. हिंदी मालिका सृष्टीतील या दमदार एन्ट्रीसाठी आयुषीचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा!