काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातला त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यावेळी त्यांच्या चाहत्यांनी काळजी व्यक्त केली होती. मात्र जास्त एक्सरसाईज केल्यामुळे त्यांची कंबर दुखू लागली होती. आणि त्याच कारणामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. गरजेपेक्षा जास्त व्यायाम करू नका नाहीतर माझ्यासारखी तुमची गत व्हायची असे रुग्णालयात असताना त्यांनी आपल्या चाहत्यांना आवाहन केले होते. योग्य उपचारानंतर धर्मेंद्र आता आपल्या घरी सुखरूप पोहोचले आहेत.
वयाच्या ८६ व्या वर्षी देखील धर्मेंद्र आपल्या फार्महाऊसमध्ये नियमितपणे व्यायाम करताना दिसतात याचे अनेक व्हिडिओ त्यांच्या सोशल अकाऊंटवर पाहायला मिळतील मात्र अतिव्यायामामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागला होता. धर्मेंद्र पाठोपाठ आता अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना देखील रुग्णालयात दाखल केले असल्याचे समोर आले आहे. रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळाला त्यावरून अनेक चाहत्यांनी चिंता व्यक्त केली होती. मात्र या फोटोमुळे चाहत्यांनी घाबरून जाऊ नये असे त्यांच्या मुलाने म्हणजेच मिमोह चक्रवर्ती याने सांगितले आहे. मिथुन चक्रवर्ती यांना गेल्या काही दिवसांपासून किडनीस्टोनचा त्रास जाणवू लागला होता.
बंगळुरू येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते त्यावेळी हा फोटो काढण्यात आला होता. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. मिमोह चक्रवर्ती याने मिथुन चक्रवर्ती यांच्या तब्येतीविषयी अपडेट देत असताना म्हटले आहे की, मिथुन चक्रवर्ती यांना किडणीस्टोनचा त्रास होता त्यासाठी बंगळुरू येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. उपचारानंतर त्यांची तब्येत आता उत्तम आहे असे मिमोहने स्पष्टीकरण दिले आहे. त्याच्या या स्पष्टीकरणावरून चाहत्यांनी देखील आता निश्वास टाकला आहे.