हेमंत ढोमे दिग्दर्शित झिम्मा २ हा चित्रपट काल शुक्रवारी २४ नोव्हेंबर रोजी राज्यभर प्रदर्शित करण्यात आला. झिम्मा चित्रपटाला महिला वर्गाने अक्षरशः डोक्यावर घेत चित्रपट हिट केला होता. तसाच काहीसा उत्स्फूर्त प्रतिसाद झिम्मा २ याही चित्रपटाला मिळताना दिसत आहे. काल पहिल्याच दिवशी चित्रपट पाहून आलेल्या प्रेक्षकांनी झिम्मा २ आवडल्याचे सांगितले होते. मुंबई, पुणे, संभाजीनगर, कोल्हापूर तसेच नाशिक जिल्ह्यातून चित्रपट पाहायला प्रेक्षकांनी हाऊसफुल्ल गर्दी केली होती.
विशेष म्हणजे सकाळी आणि रात्रीच्या शोला लोकांनी जास्त पसंती दर्शवली होती. त्यामुळे झिम्मा २ हा चित्रपट आता बॉक्सऑफिसवर बक्कळ कमाई करणारा चित्रपट ठरेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. जीओ स्टुडिओज प्रस्तुत हेमंत ढोमे निर्मित आणि दिग्दर्शित झिम्मा २ या चित्रपटात क्षिती जोग, अनंत जोग, निर्मिती सावंत, शिवानी सुर्वे, सुचित्रा बांदेकर, सायली संजीव, रिंकू राजगुरू, सुहास जोशी यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट महिलांचा आहे आणि त्या हिट करणार असे या चित्रपटाबाबत अगोदरच बोलले जात होते. आणि म्हटल्याप्रमाणे महिलावर्गाने थिएटरबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड देखील झळकवले आहेत. काल पिंपरी चिंचवड मधील चित्रपट गृहात फर्स्ट डे फर्स्ट शोलाच हाऊसफुल्ल गर्दी जमली होती.
हा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून चित्रपटातील कलाकार देखील खूपच भारावून गेले आहेत. काल पहिल्याच दिवशी चित्रपटाने बॉक्सऑफिसवर चांगली कमाई केलेली पाहायला मिळाली. १.२० कोटी हा कमाईचा आकडा मराठी चित्रपटासाठी मोठाच म्हणावा लागेल कारण शनिवारी आणि रविवारी हा आकडा अधिक होतो हे एक ठरलेले गणित आहे. झिम्मा २ हा चित्रपट बनवण्यासाठी ६ कोटींचा खर्च झाला असल्याचे बोलले जाते. त्यामुळे अवघ्या तीन दिवसातच चित्रपट त्याचा झालेला खर्च भरून काढणार याची शाश्वती दिली जाते. कारण शनिवारी आणि रविवारी या दोन्ही दिवसात चित्रपट बॉक्सऑफिसवर ५ कोटींहून अधिक कमाई करेल असे म्हटले जात आहे. दरम्यान टायगर ३ या बॉलिवूड चित्रपटाला आता प्रेक्षकांकडून थंड प्रतिसाद मिळू लागला आहे. याचा फायदा झिम्मा २ ला नक्कीच होणार आहे.