स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच घरोघरी मातीच्या चुली आणि साधी माणसं या दोन नव्या मालिका प्रसारित होत आहेत. १८ मार्चपासून सोमवार ते शनिवारी रात्री रात्री ७.३० वाजता रेश्मा शिंदे हिची प्रमुख भूमिका असलेल्या घरोघरी मातीच्या चुली या मालिकेची उत्कंठा आतापासूनच शिगेला पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या मालिकेचे दोन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. त्यात रेश्मा शिंदे प्रमुख भूमिका साकारणार हे स्पष्ट झाले होते. त्याच जोडीला सविता प्रभुणे, आशुतोष पत्की, प्रतीक्षा मुणगेकर, आरोही सांबरे, उदय नेने, प्रमोद पवार असे कलाकार सहाय्यक भूमिकेत झळकणार हेही दिसून आले.

मात्र मालिकेचा नायक कोण असणार याबाबत गुपित ठेवण्यात आले होते. प्रभू श्रीरामासाख्या निष्ठावान हृषीकेशचे या मालिकेच्या प्रोमोत मोठे कौतुक करण्यात आले त्यामुळे या भूमिकेने प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले होते. हा हृषीकेश नेमका आहे तरी कोण याबाबत प्रेक्षकांकडून तर्कवितर्क लावण्यात आले. ही भूमिका आशुतोष गोखले साकारू शकतो अशीही चर्चा पाहायला मिळाली. मात्र आता यावरचा पडदा नुकताच हटला असून ही भूमिका अभिनेता सुमित पुसावळे साकारणार असे समोर आले आहे. हृषीकेशचे पात्र सुमित पुसावळे साकारणार हे कळताच तो ही भूमिका उत्तमपणे निभावू शकतो असा विश्वास प्रेक्षकांनीही व्यक्त केला आहे. नुकताच या मालिकेचा नवीन प्रोमो वाहिनीने प्रसारित केला आहे ज्यात सुमित पुसावळेचा डॅशिंग लूक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

याअगोदर सुमित बाळू मामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत प्रमुख भूमिका साकारताना दिसला होता. मात्र आता सुमितने या मालिकेतून काढता पाय घेतला आहे. त्यामुळे बाळू मामाची भूमिका आता ज्येष्ठ अभिनेते प्रकाश धोत्रे साकारणार असल्याचे जाहीर केले आहे. ज्या भूमिकेने सुमितला ओळख मिळवून दिली ती भूमिका सोडून जाताना सुमितला नक्कीच त्रास होत आहे. प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्याने आभार देखील मानले आहेत. या मालिकेला निरोप दिल्यानंतर सुमित एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येईल असे त्याने म्हटले होते. त्यामुळे ही नवीन मालिका घरोघरी मातीच्या चुली आहे हे आता स्पष्ट झाले आहे. या नवीन भूमिकेसाठी सुमित पुसावळे याला खूप खूप शुभेच्छा.