स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेला एक मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळणार आहे. इतके दिवस कटकारस्थान करून बिनधास्त राहणारी शालिनी आता गौरी आणि जयदीपला कायमचा संपवण्याचा घाट घालत आहे. गौरी आणि जयदीप या दोघांची मालिकेतून एक्झिट होणार, मात्र या नंतर ही मालिका २५ वर्षांचा लीप घेणार आहे. जयदीप आणि गौरी आपल्यात नाहीत हे माईंना सहन होत नाही ते दोघेही पुनर्जन्म घेणार असा त्यांना विश्वास आहे. त्यांचा हाच विश्वास आता सत्यात उतरणार आहे. जयदीप आता अधिराजच्या रुपात पुन्हा एकदा जन्म घेतो.
जयदीप उच्च शिक्षित, त्याच बाजूला अधिराज गावच्या मातीत वाढलेला रांगडा गडी दाखवण्यात आला आहे. तर दुसरीकडे गौरी गावंढळ अशिक्षित पण तिचा पुनर्जन्म नित्याच्या रुपात होणार आहे. नित्या ही सुशिक्षित आणि श्रीमंत कुटुंबात वाढलेली मुलगी. आता अधिराज आणि नित्या यांची नेमकी भेट कशी होते हे पाहणे रंजक ठरणार आहे. पण एकीकडे या मालिकेच्या वेळेत लक्ष्मीच्या पाऊलांनी ही नवी मालिका दाखल होत आहे. त्यामुळे अनेकांनी सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका निरोप घेणार असेच अंदाज बांधले होते. पण आता सुख म्हणजे नक्की काय असतं मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत नाही हे निश्चित झाले आहे. २० नोव्हेंबर पासून मालिका आता रात्री १० वाजता प्रसारित केली जाणार आहे.
पण मालिकेचा हा एवढा मोठा ट्विस्ट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी अक्षरश डोक्याला हात लावला आहे. मालिका निरोप घेणार म्हणून प्रेक्षकांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. पण इथे तर जयदीप आणि गौरीच्या पुनर्जन्माची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. ही मालिका रात्री बारा वाजता दाखवली तरी काही हरकत नाही अशी संतप्त प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून मिळत आहे. तर सततच्या ट्विस्टला पाहून प्रेक्षकांनी या मालिकेकडे पाठ फिरवली आहे. पण एकीकडे प्रेक्षकांकडून या मालिकेवर टीका होत असली तरी ही मालिका टीआरपीच्या स्पर्धेत टॉप पाचच्या यादीत आपले स्थान टिकवून ठेवताना दिसत आहे. आता तर या नव्या ट्विस्टमुळे मालिका अधिक रंजक होईल असा काही प्रेक्षकांनी अंदाज बांधला आहे.