झी मराठी वाहिनीवरील बँड बाजा वरात हा शो लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. सुरुवातीला या शोमध्ये रेणुका शहाणे आणि पुष्करराज चिरपुटकर परीक्षक आणि सूत्रसंचालकाच्या भूमिकेत झळकले होते. लग्नापूर्वी जोडप्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आमंत्रित करून वेगवेगळे टास्क देण्यात येत होते, या दोन स्पर्धकांमध्ये रंगलेली चुरस प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. विजेत्या जोडीला बक्षीस म्हणून पैठणी आणि मणीमंगळसूत्र देऊन सन्मानित करण्यात येत होते. मात्र त्यानंतर या शोमध्ये मृण्मयी देशपांडे ही सुत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळू लागली. अशोक सराफ, भारत गणेशपुरे, किशोरी शहाणे यांच्यासह किरीट सोमय्या सारख्या राजकारण्यांना देखील आमंत्रीत करून त्यांची लग्न लावून देण्यात आली.

मात्र आता हा शो लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचे समोर आले आहे. येत्या २९ जुलै पासून शुक्रवार आणि शनिवारी रात्री ९.३० वाजता ‘बस बाई बस’ हा नवीन रिऍलिटी शो झी मराठी वाहिनीवर दाखल होत आहे. या शोचे सूत्रसंचालन सुबोध भावे करताना दिसणार आहे. महिलांसाठी राखीव बस आयोजित करून बसमध्ये बसलेल्या महिलांना सुबोध भावे बोलतं करताना दिसणार आहे. सहभागी झालेल्या महिलावर्गाला वेगवेगळे टास्क देऊन त्यातून उडणारी धमालमस्ती प्रेक्षकांचे निश्चितच मनोरंजन करेल अशी आशा आहे. या शोमधून आणखी एक नवी संकल्पना मांडण्याचा प्रयत्न झी मराठी वाहिनीने केला आहे. येत्या काही काळातच हा शो नेमका कशावर आधारित असेल या गोष्टीचा लवकरच उलगडा होईल.

सुबोध भावे या शोचे सूत्रसंचालन करणार असल्याने त्याच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. तुला पाहते रे या मालिकेनंतर सुबोध पुन्हा एकदा झी मराठी वाहिनीवर झळकणार आहे. सुबोध भावेचे सूत्रसंचालन प्रेक्षकांनी पाहिले आहे त्यामुळे त्याच्या या नव्या शोची उत्सुकता अधिक वाढली आहे. या रिऍलिटी शो सोबतच झी मराठी वाहिनी आणखी एक शो प्रेक्षकांसमोर आणत आहे. छोट्या कलाकारांसाठी डान्स इंडिया डान्स हा शो किचन कल्लाकारच्या जागी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची निवड प्रक्रिया लवकरच पूर्ण होत आहे त्यामुळे येत्या काही दिवसातच या शोच्या प्रसारणाची तारीख जाहीर करण्यात येईल. तूर्तास किचन कल्लाकार आणि बँड बाजा वरात हे दोन्ही शो प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.