आदेश बांदेकर हे होम मिनिस्टरमुळे भाऊजी बनून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. उत्तम सूत्रसंचालक म्हणून झी मराठीने त्यांना वेळोवेळी सन्मानित देखील केले आहे. मात्र आता बांदेकर कुटुंब निर्मिती क्षेत्रातही नशीब आजमावत आहे. सुचित्रा बांदेकर आणि आदेश बांदेकर यांनी ठरलं तर मग ही मालिका निर्मित केली. प्रेक्षकांनी या मालिकेला अक्षरशः डोक्यावर घेतलं. गेली वर्षभर ठरलं तर मग ही मालिका महाराष्ट्राची नंबर एकची मालिका बनून यशाची घोडदौड सुरू ठेवताना दिसली आहे. त्याच जोडीला आता घरोघरी मातीच्या चुली ही आणखी एक मालिका ते प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. आज पुण्यातील ढेपेवाडा इथे या मालिकेचा लॉन्च सोहळा पार पडला.
यानिमित्ताने आदेश बांदेकर, सुचित्रा बांदेकर, सोहम बांदेकर यांच्यासह मालिकेची सर्व टीम ढेपे वाड्यात दाखल झाली आहेत. या मालिके पाठोपाठ आदेश बांदेकर त्यांची तिसरी मालिका कलर्स मराठी वाहिनीवर घेऊन येणार आहेत. काही दिवसांपूर्वी केदार शिंदे यांची कलर्स मराठी वाहिनीचे हेड म्हणून नियुक्ती करण्यात आली. तेव्हा केदार शिंदे यांनी आदेश बांदेकर या त्यांच्या खूप जवळच्या मित्राला निर्माता म्हणून नवीन मालिका घेऊन येण्याचे सुचवले. त्यानंतर आता सुख कळले ही नवीन मालिका कलर्स मराठी वर येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. स्पृहा जोशी आणि सागर देशमुख हे या मालिकेत मुख्य भूमिका साकारणार आहेत. या मालिकेची निर्मिती आदेश बांदेकर यांची असणार आहे. त्यामुळे एकाचवेळी बांदेकर कुटुंब तीन मालिका प्रेक्षकांच्या समोर आणत आहेत.
कौटुंबिक मालिकेमुळे आणि वेगळ्या विषयामुळे या मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतील अशी आशा प्रेक्षकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. ठरलं तर मग मालिकेत जुई गडकरी आणि अमित भानुशाली ही फ्रेश जोडी प्रेक्षकांना पहायला मिळाली त्यानंतर घरोघरी मातीच्या चुली मालिकेत रेश्मा शिंदे आणि सुमित पुसावळे ही फ्रेश जोडी त्यांनी समोर आणली आणि आता सुख कळले मालिकेतून स्पृहा जोशी आणि सागर देशमुख ही आणखी एक नवीन जोडी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. या तीन मालिकेच्या निमित्ताने आता सुचित्रा बांदेकर आणि सोहम बांदेकरवर एक मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. पण सेटवर खेळीमेळीचे वातावरण आणि कलाकारांचे वेळेवर मानधन दिले की काहीच अडचण भासत नाही हे सूत्र हेरूनच त्यानी निर्मिती क्षेत्रात उतरण्याचे धाडस दाखवले आहे. आणि या क्षेत्रात बांदेकर कुटुंब आता चांगलाच जम बसवताना पाहायला मिळत आहेत.