काही दिवसांपूर्वी सारेगमप लिटिल चॅम्प्स फेम मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे या गायकांनी एकमेकांच्या प्रेमात असल्याची जाहीरपणे कबुली दिली होती. हे दोघेही अनेकदा गाण्याचे कार्यक्रम एकत्रित सादर करायचे. तेव्हापासूनच दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत असे बोलले जात होते. मात्र ऑफिशियली हे नातं जाहीर करण्यात न आल्याने त्यांच्या चाहत्यांनी याबाबत मौन बाळगले होते. शेवटी, आमचं ठरलंय असे म्हणत या दोघांनी जेव्हा ही बाब सोशल मीडियावर जाहीर केली. तेव्हा त्यांच्या चाहत्यांनाच नव्हे तर सेलिब्रिटींनाही आश्चर्याचा सुखद धक्काच बसला.

यावेळी मराठी सृष्टीतील अनेक मोठमोठ्या सेलिब्रिटींनी त्यांच्या या पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव केलेला पाहायला मिळाला. तेव्हा स्पृहा जोशीने ‘वा बुवा वेलकम वहिनी’ असे म्हणत दोघांचेही अभिनंदन केले. त्यावर अवधूत गुप्तेने तिच्या या कमेंटची दखल घेतली आणि ‘व्हाय नॉट वेलकम जीजू?’ असे म्हणत त्यावर प्रशचिन्ह उपस्थित केला. अवधुतची ही कमेंट पाहून स्पृहाने तिच्या म्हणण्याचे स्पष्टीकरण दिले. प्रथमेश हा स्पृहा जोशीचा सासरा आहे याचा खुलासा करताच प्रथमेश सुद्धा ‘सासरा आहे मी तिचा’ असे म्हणत स्पृहाच्या म्हणण्याला दुजोरा देतो. त्यावर मुग्धाची प्रतिक्रिया चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. ‘हो गं, म्हणजे हे मला कळलं तेव्हा माझंही असंच झालं की म्हणजे मी सासू! नाही.’ तेव्हा सगळेजण मुग्धाच्या प्रतिक्रियेवर हसायला लागतात.

खरं तर प्रथमेश लघाटे आणि स्पृहा जोशी यांच्यात जवळचे कौटुंबिक नातेसंबंध आहेत. स्पृहाचा नवरा वरद लघाटे हा प्रथमेशचा पुतण्या आहे. त्यांच्यातील या अगदी जवळच्या नात्यामुळे प्रथमेश लघाटे हा स्पृहाचा चुलत सासरा लागतो. या नात्याने आता मुग्धा आणि प्रथमेशला ती सासू सासऱ्यांचा मान देताना दिसते. कला सृष्टीत असे अनेक नातेसंबंध तुम्हाला अनुभवायला मिळतील. कोणी गायन क्षेत्रात तर कोणी अभिनय क्षेत्रात असलेली ही मंडळी आपापले करिअर करत असतात. कामाच्या वेळा, नवीन प्रोजेक्त साठीची धावपळ, लांबीचे शूटिंग या सर्वांपासून वेळ देणेही कधी कधी शक्य होत नसते. या प्रत्येकाच्या आयुष्याचा जोडीदार सुद्धा याच क्षेत्रातील असल्याने एकमेकांना समजून घेण्याची वैचारिक क्षमता त्यांच्यात वाढलेली असते.