अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही मूळची पुण्याची. अभिनव विद्यालयातून शिक्षण घेतल्यानंतर तिने फर्ग्युसन महाविद्यालयात आपले शिक्षण पूर्ण केले. सत्यदेव दुबे यांच्या अभिनय कार्यशाळेत अभिनयाचे धडे गिरवल्यानंतर सोनाली आणि तिचा भाऊ संदेश समन्वय नाट्यसंस्थेशी जोडले गेले. सुरुवातीला नाटकातून काम करत असताना १९९२ साली चेलुवी या कन्नड चित्रपटात तिला झळकण्याची नामी संधी मिळाली. मराठी, हिंदी, गुजराथी, तमिळ, कन्नड अशा चित्रपटातून सोनालीने आपल्या अभिनयाची जादू दाखवून दिली. सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असलेली पाहायला मिळते. अभिनय कारकिर्दीच्या प्रवासात ती नेहमीच आपल्या आठवणींना उजाळा देताना दिसते.
पुण्यातील बालपणीच्या आठवणीत रममाण झालेल्या सोनालीने आज एक खास पोस्ट शेअर केली आहे. बालपणीचा चपलांचा एक किस्सा सांगताना तिने आपल्या मुलीला देखील हा अनुभव घेताना पाहिले आहे. सोनाली कावेरीचे निरीक्षण करताना दिसली हे निरीक्षण करत असताना त्यात तिला जे सुख मिळालं ते तिने आपल्या शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कावेरीला पाहून बालपणीच्या आठवणीत गेलेली सोनाली म्हणते की, लहानपणी माझ्या चपला सतत तुटायच्या. त्यामुळे महादेव मंदीराच्या पुढे आमचे जे चांभार होते, त्यांच्याकडे सायकल थांबवून मी नेहमी जायचे. ते त्यांच्या दाभणासारख्या सुईनी टाके घालून द्यायचे किंवा खिळा मारून दुरूस्त करून द्यायचे.
आता अति टिकाऊ पादत्राणं असतात, तुटत बिटत नाहीतच! पण सुदैवानं परवा कावेरीची चप्पल तुटली आणि आमची जोडगोळी चांभार शोधत निघाली. आमच्या पुण्याच्या घराच्या अलिकडेच त्यांची गाठ पडली. कावेरी तन्मयतेनं त्यांचं काम बघत बसली होती. मला किती आणि का बरं वाटलं, हे मला शोधायचंही नाहीए. नंतर तिला घेऊन ह्या बसस्टॅापवर बसले ५ मिनिटं, कुठल्याच बसची वाट न पाहता. मग काहीतरी कळलं मला, जपता येतं खोल आतलं वाटणं. सारखं भरून आलं तर कसं चालेल बरं. सोनालीच्या या पोस्टवर कलाकारांनी तिच्या या साधेपणाच मोठं कौतुक केलं आहे. हे छोटे छोटे अनुभव आपल्या मुलांनाही मिळावेत आणि त्यातून त्यांनी शिकत पुढे जावे हाच यामागचा तिचा मुख्य उद्देश होता.