काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमात ती जे काही बोलताना दिसली त्यावर अनेकांनी कौतुकाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. सोनाली कुलकर्णी हिने आजवर मराठी सृष्टीतच नाही तर दाक्षिणात्य आणि बॉलिवूड सृष्टीत देखील नाव कमावलं आहे. मुलींनी स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, घर संसाराला हातभार लावला पाहिजे असे सोनाली एका कार्यक्रमात बोलताना दिसली. तिचा हा व्हिडीओ ट्विटरच्या माध्यमातून मोठा प्रसिद्धी मिळवताना दिसत आहे. सोनालीने कार्यक्रमात सांगितले की, भारतातील बऱ्याचशा मुली आळशी आहेत.
आजकालच्या मुलींना लग्नासाठी खूप शिकलेला, मोठया पगाराची नोकरी असलेला, स्वतःचं घर असलेला मुलगा हवा असतो. पण तू स्वतः काय करू शकते हे ती काहीच सांगत नाही. आपल्या देशातील लोकांनी अशा मुली घडवा जी स्वतःच्या पायावर उभी राहू शकेल. लग्नानंतर तिने म्हणायला हवं की आता आपल्याला फ्रीज घ्यायचा आहे, तर मी माझे निम्मे पैसे देते. मुलींनी कमीत कमी एवढं शिकलं पाहिजे की ती स्वतःचा खर्च भागवू शकेल. माझी एक जवळची मैत्रीण आहे. ती लग्नासाठी मुलगा शोधत होती. त्या मुलाला ५० हजाराच्या आत पगार नसावा अशी तिची अट होती. शिवाय तो मुलगा एकटा राहणारा असावा आणि त्याच्याकडे चार चाकी गाडी सुद्धा असावी. त्यावेळी मला तिचं म्हणणं मुळीच पटलं नाही.
तू मुलगा शोधतीयेस का मॉल मध्ये आलीयेस असा प्रश्न तिला मी केला होता. आताच्या मुलांनी सुद्धा खूप जबाबदारीने वागायला हवं, मजामस्ती सोडून त्यांनी कुटुंबाची जबाबदारी घ्यायला हवी. माझा भाऊ, माझा नवरा आणि बरीचशी पुरुष मंडळी खूप कमी वयात जबाबदारीने वागली आहेत. मात्र आताच्या मुली २५ वय होऊन गेलं तरी बॉयफ्रेंडला असं लग्न हवं, परदेशात हनिमून हवा अशी अट घालतात. डेस्टिनेशन वेडिंग आणि इतर खर्चासाठी आपल्या बॉयफ्रेंडकडे, नवऱ्याकडे पैसे मागतात. का तुम्हाला अशा गोष्टींसाठी नवऱ्याकडे का पैसे मागावे लागतात. तुम्ही स्वतः कमवू शकत नाहीत का. शिका, नोकरी करा, काम शोधा. छोट्या छोट्या गोष्टींसाठी भांडू नका.
पुढची सहा महिने मी बिल भरते म्हणून सांगा बघा तुम्हाला काशी गोड स्माईल मिळेल. केवळ जेवण बनवणं यापेक्षाही आणखी बऱ्याच गोष्टी आहेत ज्यातून तुम्ही तुमच्या नवऱ्याला खुश ठेवू शकता. सरकारने आपल्याला ५० टक्के आरक्षण देऊन ती जबाबदारी पार पाडली आहे. पण आपण सुद्धा जबाबदारीने वागायला हवं असं मला वाटतं. सोनालीच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमधून टाळ्यांचा कडकडाट ऐकायला येतो.