सिद्धार्थ जाधवने मराठी चित्रपटाला भरीव योगदान दिले आहे. विनोदी कलाकार, सहाय्यक भूमिका ते चित्रपटाचा नायक असा त्याचा अभिनय क्षेत्रातला आलेख चढताच राहिला आहे. अगदी सिंघम २, गोलमाल सारख्या बॉलिवूड चित्रपटातून त्याने आपल्या सजग अभिनयाची छाप सोडली आहे. मराठी सृष्टीतील बहुतेक कलाकार मंडळींनी हिंदी चित्रपट सृष्टीत आपले नशीब आजमावले आहे. त्यात सिध्दार्थचे नाव घ्यावे लागेल मात्र आता सिद्धार्थ दाक्षिणात्य सुपरस्टार्स सोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. गांधी टॉक्स या नावाने मुकपट असलेला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारतीय चित्रपट सृष्टीतील काळ हा मुकपटाने सुरू झाला होता.
त्यामुळे केवळ संगीताची साथ मिळालेल्या या मुकपटात केवळ चेहऱ्यावरील हावभावावरूनच कलाकारांना प्रेक्षकांची मनं जिंकावी लागणार आहेत. महत्वाचं म्हणजे गांधी टॉक्स या चित्रपटात विजय सेतुपती, अरविंद गोस्वामी, सिद्धार्थ जाधव आणि अदिती राव हैदरी यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांच्या जयंतीदिवशी या सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. ‘गांधी टॉक्स’ या सिनेमाचे दिग्दर्शन किशोर बेलेकर करत आहेत. चित्रपटाचा टिझर पाहून प्रेक्षकांनी भरभरून प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एकंदरीत टीझरवरुन हा सिनेमा पैशांच्या खेळावर आधारित असल्याचे तुमच्या लक्षात येईल. गांधींजींची तीन माकडंही या टीझरमध्ये दिसत असल्याने, जी तुमच्या नजरेतून न सुटणारी आहेत.
झी स्टुडिओज, क्युरियस डिजिटल आणि मुव्ही मिल एंटरटेनमेंट यांची सहनिर्मिती असणारा हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. गांधी टॉक्स या चित्रपटामुळे पुन्हा एकदा मुकपटाचा काळ जगुया असे त्याने म्हटले आहे. सिनेमा मुकपट असला तरी ए आर रहमान यांच्या संगीताची कमाल सिनेमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे. या सिनेमाला साऊथचा टच असल्याने तो दाक्षिणात्य चित्रपट मनाला जात आहे. सिध्दार्थची टॉलीवूड वारी या चित्रपटाने पूर्ण होणार आहे. अरविंद गोस्वामी, विजय सेतुपती यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याने सिद्धार्थ खूपच खुश झाला आहे. अर्थात चित्रपटात कुठलाही डायलॉग नसला तरी आपल्या अभिनयाने तो प्रेक्षकांची मनं नक्कीच जिंकून घेणार याची खात्री आहे.