अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २०२१ साली सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांनी मोठ्या थाटात लग्न केलं होतं. मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर हे मराठी सृष्टीतील लाडकं कपल आहे. दोघेही एकमेकांना किती अनुरूप आहेत याची प्रचिती देणारे अनेक व्हिडीओ हे दोघे सोशल मीडियावर नेहमीच शेअर करताना दिसतात. सिद्धार्थ किती खोडकर आहे हे त्याच्या मित्रपरिवाराला चांगलेच ठाऊक आहे. मितालीची थट्टा मस्करी करणे सिध्दार्थला नेहमीच सुखावणारे ठरले आहे. मग सिध्दार्थची झाडूने केलेली धुलाई असो वा घरात घुसलेल्या पालीमुळे मितालीची उडालेली घाबरगुंडी.

अशा मजामस्ती करतानाचे व्हिडीओ सिद्धार्थ नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्यांच्या या सुखी संसाराला जवळपास दीड वर्ष पूर्ण होत आहे, यातच आज सिद्धार्थचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने मितालीने त्याच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. ‘मी सिध्दार्थच्या प्रेमात का पडले’ याचे खास कारण मितालीने या पोस्टमध्ये दिलं आहे. ती म्हणते की, मी प्रेमात का पडले हे आठवते का! तुला जीएसटी कसा भरायचा हे माहीत होते म्हणून? की अप्रतिम खिचडी बनवली म्हणून? किंवा स्वयंपाकघर काउंटरटॉप स्वच्छ सुंदर करतो म्हणून! डिनर डेट प्लॅन करतो म्हणून? छे! हे साफ चुकीचे आहे.

मी तुझ्या प्रेमात पडले कारण तू मला रोमांचकारी आणि सोबत जीवन जगायचे वचन दिले! आपल्या आवडी निवडी सारख्या आहेत आणि आपण दोघेही नेहमी हटके होतो आणि अजूनही आहोत! कारण तू मला पहिल्यांदाच स्वतंत्र असल्याची जाणीव करून दिली होती. आणि तुझ्या नजरेत मी स्वतःला शोधू शकले. तू माझा सर्वात चांगला मित्र आहेस. तसे पुण्याच्या मुलासाठी मुंबईची मुलगी भेटणे कितीही अशक्य असले तरी, मला असे वाटले की हे खूप अनोखे आहे. आपल्या आयुष्याचा मनासारखा जोडीदार भेटणे हे अगदी स्वर्गसुखासारखे आहे. सिद्धार्थ तू आजही माझ्या स्वप्नातील राजकुमार आहेस!
मी तुझ्यासाठी प्रत्येक क्षणी याहून उत्तम बनण्याचे वचन देते. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या सख्या! महत्वाचं म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी मितालीने त्याचे गुणगाण गाणं मृण्मयी देशपांडेला संशयास्पद वाटत आहे. अर्थात त्याचा खोडकर स्वभाव ही कलाकार मंडळी चांगलेच जाणून आहेत. मितालीची पर्यायाने सिध्दार्थची फिरकी घेत ‘हे नक्की तू लिहिलं आहेस का सिद्धूनी तुझा मोबाईल घेऊन स्वतः लिहून पोस्ट केलं आहे, नेहमीप्रमाणे?’ असे मजेशीर कमेंट करत मृण्मयीने पुसटशी शंका उपस्थित केली आहे. मितालीच्या या पोस्टवर सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी सिध्दार्थला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.