स्टार प्रवाह वाहिनीवर तुझेच मी गीत गात आहे ही नवी मालिका प्रसारित होत आहे. या मालिकेत स्वरा हे मध्यवर्ती पात्र आहे. मल्हार वैदेहीला सोडून दुसरा संसार थाटतो त्याला पिहु नावाची मुलगीही असते. तर वैदेही आपल्या मुलीसोबत भावाकडे राहत असते मात्र तिला नवरा सोडून गेला म्हणून श्यामला वहिनीकडून सतत बोलणी खावी लागत असतात. मालिकेच्या पहिल्याच एपिसोडमध्ये मालिकेचे कथानक उलगडताना पाहायला मिळाले. उर्मिला कोठारे, प्रिया मराठे, अभिजित खांडकेकर, उमेश बने, दीप्ती जोशी हे तगडे कलाकार या मालिकेला लाभले आहेत. तर अन्वी तायवडे आणि अवनी जोशी या बालकलाकारांनी अनुक्रमे स्वरा आणि पिहुची भूमिका साकारली आहे.
मालिकेत श्यामला मामीची भूमिका काहीशी विरोधी भूमिका दर्शवणारी आहे जी वैदेही आणि स्वराला त्रास देणारी आहे. ही भूमिका साकारणाऱ्या नायिकेला प्रेक्षकांनी नक्कीच ओळखलं असेल. ही भूमिका अभिनेत्री दीप्ती जोशी यांनी साकारली आहे. दीप्ती जोशी यांना तुम्ही झी मराठीवरील मालिकेत पाहिले आहे. माझा होशील ना या मालिकेत दीप्ती जोशी यांनी गुलप्रीत म्हणजेच गुल्लू मामीची भूमिका साकारली होती. गुल्लू मामीचे पात्र थोडेसे खट्याळ होते त्यामुळे ही भूमिका तितकीच उठावदार वाटत होती. दीप्ती जोशी यांची ही पहिलीच मराठी मालिका होती. कारण याअगोदर त्यांनी गुजराथी भाषिक मालिका, चित्रपट आणि नाटकांमधून काम केले होते. तत्ताड, केवी रिते जैश, बियोंड ब्लू अशा गुजराथी चित्रपटात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.
माझा होशील ना या मालिकेतून त्यांना मराठीत झळकण्याची संधी मिळाली. तुझेच मी गीत गात आहे यात त्यांच्या अभिनयाला पुरेसा वाव देणारी एक वेगळी भूमिका मिळाली आहे. श्यामला मामी हे विरोधी पात्र साकारत असताना ही तितकीच मोठी जबाबदारी असल्याचे त्या या भूमिकेबाबत म्हणतात. स्वरा आणि वैदेहीचा छळ करणारी ही मामी प्रेक्षकांच्या रोषाला नक्कीच सामोरे जाणार याची तिला खात्री आहे. म्हणूनच दिप्तीने हे आव्हान पेलण्याचे धाडस दाखवले आहे. कुठल्या भूमिकेमुळे आपण ओळखले जावे अशी प्रत्येक कलाकाराची ईच्छा अशाच धाटणीची ही भूमिका आहे असे दीप्ती म्हणते. या तगड्या भूमिकेसाठी आणि नवीन मालिकेसाठी दीप्ती जोशी यांना मनःपूर्वक शुभेच्छा.