बरेचसे मराठी कलाकार हे हिंदी सृष्टी गाजवताना पाहायला मिळतात. हिंदी मालिका सृष्टीत त्यांना एक वेगळी ओळख मिळालेली असते. पण आपल्या मातृभाषेत सुद्धा या कलाकारांची काम करण्याची मनापासून तयारी असते, मात्र केवळ तशी संधी मिळत नसल्याने त्यांचे काम असून राहते. अशाच एक हिंदी मालिका सृष्टी गाजवणाऱ्या शुभांगी लाटकर, तब्बल ८ वर्षानंतर मराठी मालिकासृष्टीकडे वळत आहेत. स्टार प्रवाहवरील लवकरच सुरू होत असलेल्या मन धागा धागा जोडते नवा या मालिकेतून शुभांगी लाटकर बऱ्याच प्रतीक्षेनंतर कमबॅक करत आहेत. मालिकेत नायकाच्या आईची भूमिका साकारत आहेत. शुभांगी लाटकर गेल्या अनेक वर्षांपासून मराठी नाट्यसृष्टीत कार्यरत होत्या.
नाट्य स्पर्धा, एकांकिकेमधून त्यांनी उत्कृष्ट अभिनयाची पारितोषिक पटकावली होती. २०१० साली गंगा की धीजमधून त्यांनी हिंदी मालिका विश्वात पदार्पण केले होते. नंतर टीव्ही नाटक दो दिल बंधे एक डोरी से मध्ये लताची भूमिका केली. या भूमिकेसाठी फेव्हरेट सासु म्हणून झी रिश्ते पुरस्कार पटकावला होता. इश्क का रंग सफेद, पुकार, संयुक्त, बारिश अशा अनेक टीव्ही मालिकांमध्ये त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. शुभांगी लाटकर यांचा जन्म १३ मे १९७२ रोजी मुंबई येथे झाला. त्या पूर्वाश्रमीच्या शुभांगी फावडे म्हणून नाटकातून काम करत असत. त्यांचे लग्न सुप्रसिद्ध पत्रकार आणि सकाळचे संपादक संजीव लाटकर यांच्याशी झाले आहे. त्यांना असीम आणि यशोदा ही दोन अपत्ये आहेत. मन धागा धागा जोडते नवा मालिकेतून पुनरागमन होत असल्याने आपल्या भूमिकेबाबत खूपच उत्सुक आहेत.
मराठी रंगभूमीपासून आपल्या अभिनयाची कारकीर्द सुरू करणाऱ्या शुभांगी यांनी आकाशझेप, क्षितिज, तू भेटशी नव्याने, लेक लाडकी ह्या घरची. कुणी घर देता का घर, दम असेल तर, धर्मवीर अशा चित्रपट, मालिकेतून काम केले आहे. मराठीत काम केलं की माहेरी आल्याचा फिल येत असतो. हिंदी मध्ये असं होत नाही, पण मराठीत एक आपलेपणा असतो तो इथे आल्यावर लगेचच जाणवतो. माझी मालिकेसाठी निवड झाली तेव्हा स्टार प्रवाहची मालिका आहे म्हटल्यावर मी खूपच उत्सुक झाले होते. माझ्या सासूबाईंना देखील मराठी मालिका बघायला आवडतात. माझ्या आईची ईच्छा होती की मी मराठी मालिकांमधून काम करावं. आईच्या निधनानंतर मी गोठ मालिकेतून तिची ही ईच्छा पूर्ण केली होती. मालिकेतील कलाकार खूप सपोर्टिव्ह आहेत आणि एकमेकांशी आमचं छान बॉंडिंग जुळून आलं आहे.