प्रिया बेर्डे यांनी फेब्रुवारी महिन्यात भाजप पक्षात प्रवेश केला होता. याअगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सांस्कृतिक विभागाचे कामकाज सांभाळत होत्या. मात्र इथे काम करत असताना अनेक मर्यादा येत असल्याने त्यांनी रामराम ठोकलेला पाहायला मिळाला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रिया बेर्डे यांनी पक्ष प्रवेशाबाबत भरभरून बोलले आहे. सोबतच कलाकारांची बाजू मांडताना त्या भावुक देखील झाल्या. प्रिया बेर्डे यांच्या कुटुंबातील सदस्य गेल्या तीन पिढ्यापासुन कलासृष्टीशी निगडित आहेत. आजोबा वासुदेव कर्नाटकी हे दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीशी जोडले गेले होते. वडील अरुण कर्नाटकी यांनी इंडस्ट्रीत बॅक आर्टिस्टसाठी काम केलेले आहे.

गरजू लोकांना त्यांनी स्वतःच्या पगारातून मदत केलेली आहे. त्यामुळे कलाकारांच्या अडचणी मी खूप लहानपणापासूनच जाणून आहे असे त्या म्हणतात. राष्ट्रवादी पक्षात मी काम करत होते तेव्हा मंत्र्यांच्या केबिनबाहेर कित्येक तास मला बसून राहावे लागत होते. मात्र या पक्षात आल्यानंतर मला खूप चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे असे प्रिया बेर्डे म्हणाल्या. कलाकारांच्या अडचणी सोडवण्यासाठी दुसरे कुठलेही माध्यम किंवा संस्था नाहीत. त्यामुळे मी या पक्षाचा आधार घेण्याचा निर्णय घेतला. मी वयाच्या ८ व्या वर्षांपासूनच नाटकातून काम केलं, वयाच्या १२ व्या वर्षी मला चित्रपटातून अभिनयाची संधी मिळाली होती. या इंडस्ट्रीत बॅक आर्टिस्टना दुय्यम वागणूक दिली जाते यावर कित्येकदा मी आवाज उठवला आहे.

कलाकारांना जे जेवण देता तेच जेवण तुम्ही या काम करणाऱ्या, ओझं वाहून नेणाऱ्या हातांना दिलं पाहिजे असं मी परखड मत मांडलेलं आहे. दान केलेलं, मदत केलेली कोणाला सांगू नये , पण मी मागील काळात कलाकारांच्या पाठीशी उभी राहिली होते. १०० कलाकारांचा मी विमा काढून दिला होता, त्यांना अन्नधान्य पुरवलं होतं. पण लोककलावंतांची देखील अत्यंत वाईट अवस्था झाली होती. या लोकांनी तर दुसऱ्यांच्या घरची धुणी भांडी केली होती. हे बोलताना मात्र प्रिया बेर्डे यांचा कंठ दाटून आला होता. त्या पुढे असंही म्हणाल्या की, कोल्हापूर येथे लक्ष्मीकांत बेर्डे यांनी कलाकारांच्या मदतीसाठी एक संस्था उभारली होती. बॅक आर्टिस्ट कलाकारांच्या मदतीला तो नेहमी धावून जायचा. मला प्रसिद्धी मिळावी म्हणून मी हे काम करत नाही.
मला अगोदरच खुप प्रसिद्धी मिळालेली आहे, माझ्या पाठीमागे जे नाव लागलेलं आहे ते खूप मोठं नाव आहे. त्या नावाला जपून मला काम करायचंय. आज अख्खा महाराष्ट्र त्या माणसाने हसवला त्याच्याबद्दल पण काही काही चुकीच्या गोष्टी बोलल्या जातात. १८, १९ वर्षे झाली त्या माणसाला जाऊन एवढं मोठं काम आहे त्या माणसाचं. कसं लोकं असं बोलू शकतात, मला ट्रोल करा मला बोला, बेर्डे साहेबांना काय बोलण्याचा अधिकार आहे कुणाचा. या मानसिकतेवर कसं रिऍक्ट व्हावं मला समजत नाही. आम्ही केलेल्या चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचतच नाहीत ही मोठी शोकांतिका आहे. अशी खंत प्रिया बेर्डे या मुलाखतीत व्यक्त करतात.