ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत अप्पू आणि शशांकच्या सुखी संसारात अनेकदा वाद उफाळून आलेले पाहायला मिळाले. त्यामुळे अप्पू हे घर एकत्र ठेवण्यासाठी प्रयत्न करताना दिसते. सध्या मालिकेत दिवाळी विशेष भाग रंगलेले आहेत. नुकतेच बाबी आत्याने भाऊबीज साजरी केली. त्यामुळे कानिटकर कुटुंबात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र आता या कुटुंबात वादळ येण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. ठिपक्यांची रांगोळी मालिकेत आता ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांची एन्ट्री झाली आहे. शुभा खोटे यांच्या येण्याने मालिकेला धक्कादायक वळण मिळणार की अप्पू शशांकची जवळीक वाढणार हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे.

शुभा खोटे या बऱ्याच प्रतीक्षेनंतर मराठी मालिकेकडे वळल्या आहेत. हिंदी, मराठी चित्रपटातून त्यांनी रोमँटिक भूमिका ते आज्जी पर्यंतच्या भूमिका आपल्या अभिनयाने गाजवल्या आहेत. एक दुजे के लिये या चित्रपटात त्यांनी विरोधी भूमिका साकारली होती. ती भूमिका आजही रसिक प्रेक्षकांच्या स्मरणात राहिली आहे. शुभा खोटे यांचे अभिनय क्षेत्रात पाऊल पडले ते ओघानेच. स्विमिंग आणि सायकलिंगची आवड असणाऱ्या शुभा खोटे यांनी या क्षेत्रात प्राविण्य मिळवले होते. अगदी नॅशनल चॅम्पियन म्हणून त्यांनी सलग तीन वर्षे हा किताब पटकावला होता. वडील नंदू खोटे हे मराठी चित्रपट अभिनेते तर दुर्गा खोटे या त्यांच्या काकी आणि त्यांचे मामा देखील प्रसिद्ध अभिनेते असल्याने कलेची आवड त्यांना बालपणापासूनच होती.

शाळेत असताना शुभा खोटे यांनी अनेकदा नाटकातून काम केले होते. १९५५ साली सीमा या चित्रपटाने त्यांना मोठी ओळख मिळवून दिली. या चित्रपटात शुभा खोटे यांना सायकलवरून चोराचा पाठलाग करायचा होता. भरधाव वेगात असलेली त्यांची सायकल एके ठिकाणी घसरली आणि शुभा खोटे यांच्या चेहऱ्यावर बऱ्याच प्रमाणात खरचटले. चित्रपटात काम करत असताना त्यांचे दोन वेळा अपघात देखील घडले होते. एका अपघातामुळे त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती, मात्र नॅशनल चॅम्पियन असलेल्या शुभा खोटे या जिद्दीने आपल्या पायावर पुन्हा उभ्या राहिल्या. सहाय्यक अभिनेत्री असो, नायिकेची आई असो किंवा आजीची भूमिका त्यांनी आपल्या कारकिर्दीत समर्थपणे संभाळल्या आहेत.
भाऊ विजू खोटे यांच्या निधनानंतर शुभा खोटे खचल्या होत्या; मात्र या दुःखातून स्वतःला सावरत त्या नव्या उमेदीने कला क्षेत्रात दाखल झाल्या. सिर्फ तुम, बकेट लिस्ट, टॉयलेट एक प्रेम कथा,कोयला, अनाडी अशा जवळपास १०० हुन अधिक चित्रपटातून विविधांगी भूमिका निभावल्या. ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतून त्यांचे छोट्या पडद्यावर पुनरागमन होत आहे. मालिकेच्या सेटवर कलाकारांसोबत त्यांची आता छान गट्टी देखील जमली आहे. त्यांच्या भूमिकेबाबत अजून त्यांनी स्पष्ट सांगितले नसले तरी, त्यांच्या येण्याने मालिकेला ट्विस्ट मिळाला आहे. शुभा खोटे यांचे छोट्या पडद्यावर पुनरागमन झालेले पाहून चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.